CBI, CID Difference: दया...! सीबीआय आणि सीआयडीमध्ये फरक काय? उद्देश एक पण कामे वेगवेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 20:24 IST2022-02-15T20:20:33+5:302022-02-15T20:24:41+5:30
CBI, CID Difference: एक देश तर दुसरी राज्यांच्या पातळीवर तपास करतात. दोन्हींचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांचे काम वेगवेगळे आहे.

CBI, CID Difference: दया...! सीबीआय आणि सीआयडीमध्ये फरक काय? उद्देश एक पण कामे वेगवेगळी
देशात सध्या सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा खूप चर्चेत आहेत. तर टीव्हीवर सीआयडी. या सीबीआय आणि सीआयडी या दोन्ही संस्था गुन्ह्यांची उकल करण्याचेच काम करतात परंतू दोन वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. एक देश तर दुसरी राज्यांच्या पातळीवर तपास करतात. दोन्हींचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांचे काम वेगवेगळे आहे.
सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. या तपास संस्थेची स्थापना १९४१ मध्ये झाली होती. १९६३ मध्ये याचे नाव सीबीआय झाले. मुख्यालय दिल्लीत आहे. ही तपास संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणे हाताळते.
सीबीआयचे सहा विभाग आहेत. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग, विशेष गुन्हे विभाग, धोरण आणि समन्वय विभाग, प्रशासन विभाग आणि केंद्रीय न्यायवैद्यक आणि विज्ञान प्रयोगशाळा विभाग यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार आणि फसवणुकीशी संबंधित प्रकरणांचा तपास करणे हे सीबीआयचे मुख्य कार्य आहे. यासोबतच व्यावसायिक गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे हेही सीबीआयचे काम आहे.
सीआयडी म्हणजे काय?
दिल्ली पोलीस आयोगाच्या शिफारशीवर 1902 मध्ये सीआयडीची स्थापना करण्यात आली. ही तपास संस्था राज्यातील गुन्ह्यांवर कारवाई करते. ही एजन्सी केवळ विशिष्ट राज्याशी संबंधित समस्या हाताळते. उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार सीआयडी काम करते.
सीबीआयप्रमाणे सीआयडीचेही सहा विभाग आहेत. यामध्ये फिंगर प्रिंट ब्युरो, CB-CID, अंमली पदार्थ विरोधी ब्युरो, मानवी तस्करी विरोधी कक्ष, दहशतवाद विरोधी ब्युरो आणि श्वान पथक यांचा समावेश आहे. चोरी, दरोडा आणि बनावट नोटांच्या व्यापाराशी संबंधित माहिती गोळा करणे हे सीआयडीचे मुख्य कार्य आहे. यासोबतच विशेष प्रकरणांच्या तपासासाठी पथके तयार करणे हेही सीआयडीचे महत्त्वाचे काम आहे.