जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:05 AM2019-12-31T04:05:01+5:302019-12-31T04:05:20+5:30
निवृत्तीनंतर तीन वर्षांसाठी झाली नियुक्ती
नवी दिल्ली : मावळते लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची सोमवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपवून मंगळवारी निवृत्त झाल्यावर ते पहिले ‘सीडीएस’ म्हणून सूत्रे स्वीकारतील.
लष्कर, हवाई दल व नौदलात समन्वय साधण्यासाठी आतापर्यंत जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी होती. तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिले जायचे. याऐवजी ‘सीडीएस’ पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील.
लष्करप्रमुखाचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. निवृत्त लष्करप्रमुखास सीडीएसपदी नेमल्यास त्यास तीन वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कार्यकाळ मिळेल.
जनरल रावत यांच्या बडतर्फीची मागणी
सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध लोकांना भडकावून हिंसक आंदोलनाच्या दिशने नेणे हे खºया नेतृत्वाचे लक्षण नव्हे, असे विधान करून राजकारणात लुडबूड केल्याबद्दल जनरल बिपिन रावत यांना लष्करप्रमुख पदावरून तत्काळ बडतर्फ केले जावे, अशी मागणी केरळमधील त्रिचूर येथील खा. टी. एन. प्रतापन यांनी राष्ट्रपती व सैन्यदलांचे सरसेनापती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली.
जनरल मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख
जनरल रावत यांच्या निवृत्तीनंतर नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज मुकुंद नरवणे सूत्रे स्वीकारतील. ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले लेफ्ट. जनरल नरवणे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.