बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती, पश्चिम बंगालमधील स्टार्टअप कंपनीचे अनोखे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:33 PM2022-06-25T14:33:40+5:302022-06-25T14:34:08+5:30
Research : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे. ‘ओम रेडाॅक्स’ असे नाव दिलेल्या या उपकरणाच्या उपयुक्ततेची सोशल मीडियावरूनही चर्चा सुरू झाली आहे.
सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीचे सहसंस्थापक डॉ. सौम्यजित रॉय व त्यांच्या पत्नी डॉ. पेई लियांग यांनी दावा केला की, ओम रेडॉक्स उपकरण दुसरे-तिसरे काही नसून, ऑक्सिजन निर्माण करणारा एक सखोल शास्त्रीय शोध आहे. एखाद्या अन्य यंत्राद्वारे मिळणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा आमच्या उपकरणाद्वारे मिळणारा ऑक्सिजन साडेतीन पट शुद्ध आहे.
डॉ. सौम्यजित रॉय हे कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, या उपकरणात पाण्यातून ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी प्रेशर स्विंग पद्धत वापरली जाते.देशाला स्वातंत्र्यप्राप्ती होऊन ७५ वर्षे झाली. त्यानिमित्त केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ‘ओम रेडॉक्स’ची माहिती देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात आले आहे. या उपकरणाला जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय समुदायाने मान्यता दिली आहे. पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या या नव्या उपकरणाचे जगभरात उत्पादन व्हावे, असा स्टार्टअप कंपनीचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)
असे आहे उपकरण
ओम रेडॉक्स उपकरण पांढऱ्या रंगाच्या पेटीसारखे असून, त्याचे वजन ८ किलो आहे. त्याचे बटन दाबताच उपकरणातील पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. हे उपकरण विजेवर चालते. बॅटरीचा बॅकअप साडेतीन तासांचा आहे.
आकार होईल लहान
पाण्यातून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ओम रेडॉक्स उपकरणाचा आकार आणखी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने सांगितले.