बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:58 AM2022-01-12T08:58:48+5:302022-01-12T08:59:15+5:30
डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा
- एस. पी. सिन्हा
पाटणा : कोरोना लाटेत बिहारमध्येओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२ सापडला आहे. दोन्ही व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे. द.आफ्रिकेत याचा संसर्ग झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी याचा डेल्टापेक्षा सातपट अधिक संसर्ग होतो, असे सांगितले आहे.
आयजीआयएमएसच्या प्रो. नम्रता कुमारी व डॉ. अभय कुमार सिंह यांनी सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरिएंट शरीरातील स्पाईक प्रोटीनचे एस. मार्कर स्किप करत आहे. राज्यात संसर्गानंतर ४० ते ४५ म्यूटेशन समोर आले आहेत. एकूण ३२ नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसिंगमध्ये २७ नमुन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचे दिसून आले आहे. यातील चार नमुन्यात डेल्टा व्हेरिएंट आढळला होता. मात्र, एका नमुन्यात व्हेरिएंटची ओळख पटली नाही. त्यानंतर याचा जेनेटिक पॅटर्न बीए-२ सापडला. डॉ. बी. के. चौधरी यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेत डेल्टाच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांचा मृत्यूदर ८ ते १० टक्के झाला होता.
बिहारमध्ये वीकेंड कर्फ्यू?
- बिहारमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना एक-दोन दिवसात वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकतो.
- सध्या बिहारमध्ये ६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे.
- रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी आहे. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते.
- याबाबत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीकडे आता लक्ष लागले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विमानांवरील बंदी उठविली
युराेपियन संघाने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवासी विमानांवरील निर्बंध सुमारे महिनाभराने हटविले आहेत. ओमायक्राॅन व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतच आढळला हाेता. त्यानंतर नाेव्हेंबरच्या अखेरीस निर्बंध लावण्यात आले हाेते.
लक्ष्य गाठण्यासाठी एकाच दिवशी दाखवले ११७ पॉझिटिव्ह
बिहारमध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील कल्याणपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ जानेवारीला प्रयोगशाळा तंत्रज्ञाने (लॅब टेक्निशियन) कचऱ्याच्या डब्यात टाकलेले स्वॅब लक्ष्य गाठण्यासाठी पुन्हा आरटीपीसीआरसाठी पाठवून दिले व त्यामुळे एकाच दिवसात ११५ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाचवेळी एवढे लोक पॉझिटिव्ह निघाल्यामुळे खळबळ निर्माण झाली.
तपासात प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सत्येंद्र कुमार गुप्ता यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश झा याला तत्काळ निलंबित केले. त्यानंतर इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करण्याचे आदेश दिले गेले आहेत. ५ जानेवारीला केंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या कमी होती. कार्यरत दिनेश झा याने तपासणीनंतर कंटेनरमध्ये ठेवलेल्या स्वॅबचे लक्ष्य गाठण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी नमुने तयार करून तपासणीसाठी पाठवून दिले होते.
जपानच्या सीमा बंदच
ओमायक्राॅनचा संसर्ग राेखण्याच्या दृष्टीने जपानने बहुतांश परदेशी नागरिकांसाठी देशाची सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय देशात काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस देण्याची माेहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय जपानने घेतला आहे.