IT कंपनीतील सहाय्यक उपाध्यक्षाची आत्महत्या, लैंगिक शोषणाच्या आरोपात होता निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:24 AM2018-12-20T11:24:52+5:302018-12-20T11:36:38+5:30
जेनपॅक्ट या IT कंपनीतील सहाय्यक उपाध्यक्षानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली- जेनपॅक्ट या IT कंपनीतील सहाय्यक उपाध्यक्षानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वरूप राज यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कंपनीतून निलंबित करण्यात आलं होतं. स्वरूप राज यांनी पत्नी कृतीच्या नावे ही सुसाइड नोट लिहिली आहे. ते लिहितात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर खोटेनाटे लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. ऑफिसमधल्याच एका मुलीनं माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. तपासात जरी मी निर्दोष आढळलो तरी आरोप लागल्यामुळे आजूबाजूचे लोक माझ्याकडे संशयित नजरेनंच पाहणार आहेत. असे आरोप डोक्यावर असताना मी पुन्हा कंपनीत कसा जाणार?, स्वरूप राज यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.