जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:49 PM2019-01-29T17:49:00+5:302019-01-29T17:50:41+5:30
कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे.
नवी दिल्ली - कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ते माझे आयकॉन आहेत, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली.
कामगार नेते ते देशाचे संरक्षणमंत्री असा प्रवास करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना नितीन गडकरी म्हणाले, ''कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. जॉर्ज साहेबांना जेव्हा-जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यात एक साधुत्वाची, फकीराची वृत्ती दिसली. आपल्या मुल्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचा राजकारणातील सुरुवातीचा काळ संघर्षाचा असतो मात्र एकदा सत्ता, पद-प्रतिष्ठा मिळाली की, तो तडजोडीचे, हितसंबंध जपण्याचे राजकारण करतो. सामान्य माणसाचे प्रश्न त्याला नंतर फार महत्वाचे वाटत नाहीत. जॉर्ज साहेब मात्र आयुष्यभर फक्त लढतच राहिले. ते कधी प्रस्थापित झाले नाहीत. आपल्यातील कार्यकर्तेपण त्यांनी नष्ट होऊ दिले नाही. म्हणून मी त्यांना माझा ‘आयकॉन‘ मानत होतो. आपल्या राजकारणातून सामान्य माणसासाठीचा संघर्ष, कळकळ हळूहळू कमी होत असतानाच्या काळात जॉर्ज साहेबांसारख्या लढवय्या कार्यकर्त्याचे, लोककल्याणकारी नेत्याचे निघून जाणे समाजाचे फार मोठे नुकसान करणारे आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.''