जॉर्ज फर्नांडिसांनी विमानात कोकण रेल्वेची कल्पना ऐकली अन् १५ दिवसांत सूत्रं हलली!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:12 PM2019-01-29T12:12:10+5:302019-01-29T14:55:17+5:30
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘कोकण रेल्वेचे निर्माता’ म्हटलं आहे.
नवी दिल्ली : माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
कोकण रेल्वे आणि जॉर्ज फर्नांडिस
महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबई आणि कोकणावर जॉर्ज यांचे मोठे ऋण आहे. कारण जॉर्ज यांच्यामुळेच कोकण रेल्वे होऊ शकली. कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे आणि त्याचे काम एकाच वेळी तीन ठिकाणाहून सुरू करावे, ही कल्पना त्यांचीच आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अध्यक्षपदी ई. श्रीधरन यांना नेमण्याची कल्पनाही जॉर्ज यांचीच. विमानामध्ये जॉर्ज आणि श्रीधरन एकत्र बसले होते. तेव्हा त्यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आणि जॉर्ज इतके एक्साईट झाले की त्यांनी, You put a proposal in black and white and send it to me then I will take care of it असं सांगितलं. त्यानंतर, श्रीधरन यांनी संपूर्ण प्रपोजल तयार करून पाठवले आणि 15 दिवसांतच सारी सूत्रे वेगाने हलू लागली. दिल्लीतल्या एका शासकीय इमारतीत 10 बाय 15 च्या खोलीत कोकण रेल्वेचे कार्यालय थाटले गेले. तेव्हा त्यात फक्त एक टेबल, तीन खुर्च्या आणि ई श्रीधरन हे अध्यक्ष एवढाच लवाजमा होता. येथून सुरू झालेला कोकण रेल्वेचा प्रवास आज किती विस्तारला आहे हे आपण सगळे जण पाहतो आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी ट्विटरवरुन जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘कोकण रेल्वेचे निर्माता’ म्हटले आहे.
He was the creator of #Konkan#Railways as Railway minister - when all others in #Finance and other Ministries opposed it, he single handedly did it, picked up Mr. Sridharan, created separate corporation to execute it, raised bonds by public meetings #GeorgeFernandes
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) January 29, 2019
1989 ते 1990 दरम्यान जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे मंत्री होते. सुरेश प्रभू यांनी 'ते खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचे निर्माते होते. ते रेल्वे मंत्री असताना अनेक मंत्रालयांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये अर्थमंत्रालयाबरोबरच तसेच इतर मंत्रालयांचाही समावेश होता. मात्र फर्नांडिस यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता हा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. त्यांनीच श्रीधरन यांची नियुक्ती करत कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी वेगळ्या महामंडळाची निर्मिती केली. त्यामाध्यमातून प्रकल्प पूर्ण केला. लोकांच्या बैठकी घेऊन त्यांनी या प्रकल्पाचे महत्व पटवून दिले' असे ट्वीट केले आहे.
बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता! https://t.co/GoM22qq93K
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 29, 2019
जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कामगार संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले.
...तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती राज ठाकरेंंची कानउघाडणी!https://t.co/ZlhL2IZIm5#GeorgeFernandespic.twitter.com/Kp90gi7PGS
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 29, 2019
जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 1989मध्ये त्यांनी बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटवर लोकसभा निवडणूक जिंकली. विश्वनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री राहिले आहेत. बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करत समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
कामगारांसाठी झुंजणारे नेते जॉर्ज फर्नांडिस... https://t.co/Hc7ERKddPx
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 29, 2019
1996च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पुढे 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. 1998मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले.
George Fernandes : सर्वोत्तम राजकीय नेतृत्व...; मान्यवरांकडून श्रद्धांजलीhttps://t.co/YJE0qc6DKb#GeorgeFernandes
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 29, 2019