'सेम टू सेम' सोनिया; 'ही' अभिनेत्री साकारणार काँग्रेस हायकमांडची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:59 AM2018-01-24T10:59:35+5:302018-01-24T11:02:26+5:30
संजय बारु यांचं वादग्रस्त पुस्तक 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट चित्रपटात काँग्रेस हायकमांडची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मुंबई - संजय बारु यांचं वादग्रस्त पुस्तक 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. चित्रपटात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भूमिकेसाठी जर्मन अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट चित्रपटात काँग्रेस हायकमांडची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी या भूमिकेसाठी एका इटालियन अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती, मात्र सुजैन बर्नेटचं ऑडिशन पाहिल्यानंतर तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटात अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.
महत्वाचं म्हणजे, सुर्जेन बर्नेटने याआधीही सोनिया गांधींची भूमिका निभावली आहे. याआधी तिने अभिनेता-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी निवेदन केलेल्या टीव्ही सीरिज 'प्रधानमंत्री' मध्ये सोनिया गांधींची भूमिका साकारली होती.
सुर्जेन बर्नेटने स्वत: आपलं ऑडिशन रेकॉर्ड करुन निर्मात्यांचं लक्ष खेचून घेतलं. चित्रपटाबद्दल माहिती मिळाल्यानंतर लगेचच सुर्जेन बर्नेटने मोबाइलवर आपलं ऑडिशन रेकॉर्ड केलं आणि चित्रपटाचे निर्माता सुनील बोहरा आणि दिग्दर्शक विजय यांच्याकडे पाठवलं. सुर्जेन बर्नेटने बॉम्बेकास्टिंग.कॉमच्या माध्यमातून सुनील बोहरा आणि विजय यांच्याशी संपर्क साधला. इकॉनॉमिक टाइम्सशी केलेल्या बातचीतमध्ये सुनील बोहरा यांनी सांगितलं की, 'सुर्जेन बर्नेट फक्त सोनिया गांधींसारखी दिसत नाही तर तिची संवादफेकही अत्यंत मिळती-जुळती आहे. तिचं ऑडिशन खूपच प्रेरणादायी आहे'. याआधी सुनील बोहरा यांनी 'शाहिद' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सुर्जेन बर्नेटने मुंबईत फायनल ऑडिशन दिल्यानंतर चित्रपटासाठी तिला साइन करण्यात आलं. सुर्जेन बर्नेटने अनेक भारतीय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये आलेला 'हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि नुकताच आलेला 'बिन कुछ कहे' यामध्ये तिने काम केलेलं आहे.
चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितलं आहे की, 'अनेक भारतीय आणि परदेशी अभिनेत्यांची ऑडिशन घेतल्यानंतर दोन भारतीय अभिनेत्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका गांधींच्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट केलं आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे'. चित्रपटात 140 हून अधिक अभिनेते असणार आहेत. विनोद मेहता, सिताराम येचुरी, ए राजा, एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद, सुषमा स्वराज, अमर सिंह, कपिल सिब्बल, ज्योती बसु, गुरूशरण कौर, प्रणब मुखर्जी, नटवर सिंह, पीवी नरसिम्हा राव, अजीथ पिल्लई, शिवराज पाटील, अर्जुन सिंह, उमा भारती आणि मायावती यांच्यासारख्या राजकीय दिग्गजांच्या भूमिकेसाठीही अभिनेत्यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.
मे महिन्याअखेरीस चित्रपटाचं शुटिंग पुर्ण होईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी म्हणजेच 21 डिसेंबर 2018 मध्ये चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा 90 टक्के भाग लंडनमध्ये शूट होणार आहे. संजय बारु मे 2004 ते ऑगस्ट 2008 पर्यंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. 2014 लोकसभा निवडणुकीच्या आसपास त्यांनी आपलं हे पुस्तक रिलीज केलं होतं.