साता जन्माच्या गाठी! जर्मनीची तरुणी झाली भारताची सून; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:46 AM2022-12-03T09:46:29+5:302022-12-03T09:50:16+5:30
जर्मनीची एक तरुणी बिहारच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला.
जर्मनीची एक तरुणी बिहारच्या मुलाच्या प्रेमात पडली. या दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शवल्यानंतर आता थाटामाटात विवाहसोहळा पार पडला आहे. बिहारमध्ये येऊन मिथिला परंपरेनुसार लगीनगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या सहरसाच्या पटुआहा गावात राहणारा चैतन्य झा हा जर्मनीत पुढील शिक्षणासाठी गेला होता.
चैतन्यचे सुरुवातीचे शिक्षण भारतात झाले होते. मात्र पुढील शिक्षणासाठी तो जर्मनीत शिकायला गेला होता. कॉलेजमध्ये पीएचडी करत असताना त्याची मार्था नावाच्या तरुणीशी ओळख झाली. मार्था देखील पीएचडी करत होती. येथे शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मग त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मार्थाने चैतन्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोघांनी आपआपल्या कुटुंबीयांना सांगितलं आणि त्यानंतर लग्न ठरलं.
मार्थाला हिंदी कसं बोलतात ते माहीत नाही, तरीही मिथिला रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास होकार दिला आणि इथल्या परंपरेनुसार लग्न केलं. चैतन्यच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मार्थाने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. लग्नाच्या वेळी वधूने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकेन, असे वचन दिले होते. मार्था पोलंडचे रहिवासी ओरलोवास्का यांची मुलगी आहे. लग्नासाठी ती जर्मनीहून तिच्या नातेवाईकांसह भारतात आली. या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"