जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 05:24 AM2022-12-03T05:24:21+5:302022-12-03T09:11:15+5:30

कोस्टा रिकाला नमवूनही चारवेळचे विश्वविजेते गारद

Germany out for the second time in a row in fifa worldcup | जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

Next

अल खोर (कतार) : फुटबॉल विश्वचषकाच्या ई गटात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोस्टा रिकाला ४-२ असे नमवल्यानंतरही माजी विजेत्या जर्मनीचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. यासह सलग दुसऱ्यांदा जर्मनीला विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. याच गटात अन्य सामन्यात जपानने आगेकूच करताना बलाढ्य स्पेनला २-१ असे नमवले. जपानच्या या विजयामुळे जर्मनीची संधी हुकली. 

जर्मनीची स्पर्धेतील सुरुवातच खराब झाली होती. त्यांना सलामी सामन्यात जपानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे जर्मनीला आगेकूच करण्यासाठी स्पेनला जपानविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य बनले होते. परंतु, असे झाले नाही. जर स्पेनचा विजय झाला असता, तर जर्मनीला बाद फेरीत जाता आले असते. 

सर्गे गनाब्रीने दहाव्याच मिनिटाला हेडरद्वारे गोल करत जर्मनीला आघाडीवर नेल्यानंतर येल्टशिन तेजेदाने ५८ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर ७०व्या मिनिटाला जर्मन गोलरक्षक मॅन्युएल न्युएरकडून झालेल्या स्वयंगोलमुळे कोस्टा रिकाने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, सामन्यात निर्णायक भूमिका निभावलेल्या काइ हावर्टझने दोन गोल करत जर्मनीला चांगल्या स्थितीत आणले. त्याने ७३व्या आणि ८५व्या मिनिटाला गोल केला. निकल्स फुलक्रुगने ८९व्या मिनिटाला गोल करत जर्मनीचा ४-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. 

पहिली महिला
स्टेफनी फ्रापार्ट या फ्रान्सच्या रेफ्रीने या सामन्यात रेफरिंगची जबाबदारी पार पाडली. यासह स्टेफनी ही पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात रेफरिंग करणारी पहिली महिला रेफ्री ठरली.

 

 

Web Title: Germany out for the second time in a row in fifa worldcup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.