चीन, पाकव्याप्त काश्मीर परत मिळवा
By Admin | Published: August 23, 2016 05:18 AM2016-08-23T05:18:25+5:302016-08-23T05:18:25+5:30
पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याचा मार्ग शोधा, तसेच चीनकडे गेलेला आपला भूभागही परत मिळवा
आग्रा : पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्याचा मार्ग शोधा, तसेच चीनकडे गेलेला आपला भूभागही परत मिळवा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे विधान केले आहे हे विशेष.
आग्रा कॉलेज येथे तरुण विवाहित जोडप्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले, मला आशा आहे की, सरकार पाकव्याप्त काश्मिरातील भूभाग परत मिळवू शकेल. हा मुद्दा जटिल आहे. संसदेने हा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर केला आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे. सद्याचे केंद्रातील सरकार या प्रश्नावर मार्ग काढू
शकेल. (वृत्तसंस्था)
>...तर प्रश्न सुटला असता
मोहन भागवत म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांचे काश्मीरबाबतचे धोरण पुढे चालविले असते तर हा प्रश्न सुटला असता. रोजगाराचा अभाव, संथ गतीने होणारा विकास आणि असफल ठरणारे शासन हेच काश्मीरच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. काश्मीरमधील सद्य परिस्थितीला तत्कालिन यूपीए सरकार जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.