उच्चशिक्षण स्वस्त करा! संघाचा सरकारला आदेश
By admin | Published: September 8, 2014 02:17 AM2014-09-08T02:17:05+5:302014-09-08T02:17:05+5:30
उच्चशिक्षण स्वस्त करा, ते आर्थिकदृष्ट्या माफक कसे करता येईल याचा विचार करा, असे स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिले.
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
उच्चशिक्षण स्वस्त करा, ते आर्थिकदृष्ट्या माफक कसे करता येईल याचा विचार करा, असे स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिले. जोवर सामाजिक भेदभाव आहे तोवर आरक्षणाला संघाचे समर्थन आहे, या भूमिकेचाही पुनरुच्चार केला.
माफक दरातील शिक्षणाचा विषय रेटताना भागवत म्हणाले, की ४० वर्षे मी ज्या स्वयंसेवकाच्या घरी अनेकदा भोजन केले, त्याची जात कधीच मी विचारली नाही. तो एक्साइज विभागात अधिकारी आहे; पण त्याच्या मुलीच्या कॉलेज प्रवेशाच्या वेळी शिक्षण महाग झाल्याची गोष्ट प्रकर्षाने दिसून आली.
प्रवेशासाठी त्या स्वयंसेवकाकडे ३२ लाख रुपये मागण्यात आले. प्रवेश अर्ज भरताना त्याने जातीच्या आरक्षणावर टीक मार्क केले नव्हते. ते केले असते तर ७-८ लाखांत प्रवेश झाला असता, असे सांगून भागवत म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने माझ्या वाट्याचे फायदे गरजूंना मिळावे म्हणून आपण आरक्षण घेतले नसल्याचे तो स्वयंसेवक म्हणाला.
या भावनेचा आदर करून देशातील उच्चशिक्षण स्वस्त कसे होईल याचा विचार करा, असे त्यांनी सुनावले. समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाची संधी मिळायला हवी.
राष्ट्रीय अनुसूचित जाती व जनजाती आयोगाचे अध्यक्ष विजय सोनकर शास्त्री यांच्या ‘हिंदू चर्मकार जाती, ‘हिंदू वाल्मिकी जाती’ व ‘हिंदू खाटीक जाती’ या शोधग्रंथांचे प्रकाशन रविवारी राजधानीत झाले. त्या कार्यक्रमात सरसंघचालक भागवत यांनी सरकारला ही सूचना केली. तेव्हा केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते.