कोचिंग क्लासच्या धंद्याला आळा घाला
By admin | Published: December 23, 2015 11:58 PM2015-12-23T23:58:45+5:302015-12-23T23:58:45+5:30
देशभरातील विविध शहरांमध्ये कोचिंग उद्योगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गंभीर मुद्दा खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला.
नवी दिल्ली : देशभरातील विविध शहरांमध्ये कोचिंग उद्योगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गंभीर मुद्दा खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राज्यसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
कोचिंग क्लास लावू न शकणारे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. या फोफावलेल्या व्यवसायाला लगाम लावण्यासाठी महाविद्यालयांमधील शिकवण्याच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोटा आणि अन्य शहरांमध्ये पसरलेल्या कोचिंग क्लासेसच्या जाळ्यात अडकले जातात. जाहिरातींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हमखास यशाची हमी दिली जाते. कोटा शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये ७५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त अलीकडेच मिळाले आहे. कोचिंग क्लासचा महागडा खर्च, जीव तोडून केलेला अभ्यास, वसतिगृहांमधील निकृष्ट जेवण, एकाकी जीवन आणि अपयशाची भीती ही त्यामागची कारणे आहेत. या शहरात यावर्षी २८ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)