आत्म्याला 'मुक्ती' मिळावी यासाठी हॉस्पिटलमध्येच केलं मंत्रांचं पठण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 01:56 PM2017-11-01T13:56:35+5:302017-11-01T13:58:37+5:30
आधुनिक विज्ञानाच्या युगात आपण तांत्रिकदृष्ट्या विकसित होत आहोत पण आजही समाजात अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र विद्या आणि काळी जादूसारख्या गोष्टी अस्तित्वात आहेत.
कोटा- आधुनिक विज्ञानाच्या युगात आपण तांत्रिकदृष्ट्या विकसित होत आहोत पण आजही समाजात अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र विद्या आणि काळी जादूसारख्या गोष्टी अस्तित्वात आहेत. हॉस्पिटलमध्येही अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मंगळवारी दुपारी दोन वेगवेगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी कोटामधील प्रसिद्ध महाराव भीम सिंह (एमबीएस) हॉस्पिटलच्या परिसरात तंत्र-मंत्रांचं पठण केलं. कुटुंबातील वृद्ध व्यक्ती आणि महिलेच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी तंत्र-मंत्राचं पठण केल्याचं समजतं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या परिसरात मंत्रांचं पठण केलं. हॉस्पिटलच्या परिसरात मंत्रांचं पठण केल्यानंतर त्या दोन कुटुंबातील व्यक्ती तेथून निघून गेले. पण याप्रकरणी अजून कुठलीही तक्रार दाखल झाली नाही.
बुंदी जिल्ह्यातील हिंदोलीमध्ये राहणारे चेलाराम यांचा तीन महिन्यांपूर्वी महाराव भीम सिंह हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. चेलाराम यांच्या निधनाच्या तीन महिन्यानंतर मंगळवारी त्यांचं कुटुंब एका तांत्रिकासह एमबीएस हॉस्पिटलमध्ये पोहचलं. तेथे हॉस्पिटलच्या गेटवर त्यांनी मंत्र म्हणायला सुरूवात केली. चेलाराम यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाला सतत स्वप्न पडत होती. आत्म्याला मुक्ती देण्यासाठी भाऊ विनंती करत असल्याचं स्वप्न पडत होतं, असं चेलाराम यांच्या भावाने सांगितलं. चेलाराम यांचा मुलगा शिवदास यालाही तशीच स्वप्न पडत होती. म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या गेटवर तंत्र-मंत्रांचं पठण केलं. या घटनेची माहिती मिळाल्यावर हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तेथून निघून जायला सांगितलं. हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावर आर्धा तास मंत्राचं पठण झाल्याचं पोलीस चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
याच हॉस्पिटलमध्ये एका दुसऱ्या कुटुंबानेही मंत्रांचं पठण केलं. सवरमधील मीरा नावाच्या एका महिलेचं तीन वर्षापूर्वी उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये निधन झालं. निधनाच्या तीन वर्षानंतरही मीराची आत्मा भटकत असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या आऊटडोअर गॅलेरीमध्ये तंत्र-मंत्रांचं पठण केलं.