लग्नाची हौस भोवली! महागड्या कपड्यांसाठी चोरी करणाऱ्या भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:33 AM2018-07-09T11:33:39+5:302018-07-09T11:34:49+5:30
लग्नात महागडे कपडे घालता यावेत, यासाठी गाझियाबादमध्ये दोन भावांनी एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गाझियाबाद - लग्न म्हटले की थाटमाट आणि खर्च आलाच. लग्नासाठी अनेक जण कर्ज काढतात आणि हौस पूर्ण करतात. मात्र, लग्नात महागडे कपडे घालता यावेत, यासाठी गाझियाबादमध्ये दोन भावांनी एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील संजयनगर सेक्टर 23 च्या ब्लॉकमध्ये या सॉफ्टवेअर इंजिनीअरला घरातच बांधून त्याची लूट करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
गाझियाबाद येथील सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या लूटप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या चौघांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या दोन भावांपैकी एका भावाचे शनिवारी मेरठ येथे लग्न होत आहे. त्यामुळे महागडे कपडे, दागिने व इतर खर्चासाठी या भावांनी चोरीचा डाव रचला. इंद्रजीत आणि राहुल अशी या भावांची नावे आहेत. इंद्रजीत हा पंजाबचा रहिवासी असून त्याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात चोरी आणि एनडीपीएससंदर्भातील (नार्कोटीक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टंसेस अॅक्ट) गुन्हे दाखल आहेत. एनडीपीएस गुन्हेप्रकरणात इंद्रजीतला 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार होऊन तो गाझियाबादला आला. येथेच इंद्रजीतची इतर आरोपींसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपी राहुल आणि दीपकच्या सांगण्यावरुन इंद्रजीतने सॉफ्टवेअर इंजिनीअर विश्व मुंजाळला लुटण्याचा डाव रचला. मात्र, आरोपींना विश्व यांच्याकडून जास्त पैसे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.