जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:02 AM2017-11-19T04:02:39+5:302017-11-19T07:15:03+5:30
विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं.
- सलमान खुर्शिद
(माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री)
विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं. अनेक तास बसून मी लहानसं निवेदन तयार केलं आणि पंतप्रधानांची वेळ मागितली. प्रत्यक्ष भेटीत त्यांना मी नक्की काय सांगितलं हे आता आठवत नाही पण तेव्हाही त्या एकदम विवेकी आणि समजूतदारपणे ऐकणाºया व्यक्ती होत्या हे लक्षात आहे. मी इतक्या मोठ्या काळानंतर निर्णय घेतल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं हे मला नंतर अर्जुन सेनगुप्तांनी सांगितलं. 'या तरुण पोरांना बंधनात ठेवता येऊ शकत नाही' असं इंदिराजी त्यांना म्हणाल्या होत्या.
१९६०आणि ७० च्या दशकातील नेहरूवादी राजकारणाच्या मूल्यांनी माझ्या पिढीतल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श केला होता. पहिले पंतप्रधान पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचं असणं सहज होतं. माझे आजोबा डॉ. झाकिर हुसेन बिहारचे राज्यपाल असताना पाटण्यातील राजभवनामध्ये
त्यांना भेटण्यासाठी नेहरूंबरोबर इंदिराजीही आल्या होत्या. त्या वेळेस मी त्यांना पाहिलं. नेहरू मुलांचे आकर्षण होते. माझे आजोबा साठच्या दशकात उपराष्ट्रपती होऊन दिल्लीमध्ये आले. तेव्हा आम्ही त्यांच्या बंगल्यात जात असू, पं. नेहरू गंभीर आजारी होते ती सकाळ मला आठवते. दुपारी आजोबा जेवणासाठी घरी आले तेव्हा त्यांना मी माझ्या आईशी बोलताना ऐकलं. पं. नेहरूंना वाचवण्यासाठी अशक्य वाटणारे आॅपरेशन करावे का, असं डॉक्टरांनी विचारलं होतं. सर्वांच्या जवळ असणारी व्यक्ती अशी दूर जाणं दु:खदायक होतं. सर्व दु:खं पचवणाºया माझ्या आजोबांनाही त्या वेळेस मोडून पडलेलं मी पाहिलं.
वडिलांनंतर त्यांची जागा इंदिराजींनी घ्यावी अशी अनेकांची इच्छा होती. पण त्या लगेचच पंतप्रधान झाल्या नाहीत. मात्र ताश्कंदमध्ये लालबहादूर शास्त्रींचे निधन झाल्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या. माझ्या आजोबांना भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपद पणाला लावलं आणि त्यानंतर या मोठ्या निर्णयात त्यांना मिळालेल्या यशामुळे भारतीय राजकारणाची दिशाच बदलून गेली.
मी सेंट स्टीफन्स कॉलेजात शिकत असताना महात्मा गांधींचे निकटवर्तीय बीबी अॅमतस सलाम यांनी १९७१ च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची विनंती केली. कॉलेज संपलं की मी व माझे दोन मित्र गाडी घेऊन त्यांच्या प्रचारासाठी जात असू. दहा दिवसांनंतर आम्हाला इंदिराजी व त्यांच्या कुटुंबीयांबरोबर जेवणाची संधी मिळाली.
आॅक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजात अध्यापन करताना मला इंदिराजींचा ओएसडी म्हणून काम करण्याची संधी आली. आॅक्सफर्डमध्ये डॉ. अर्जुन सेनगुप्ता मला चायनिज जेवायला घेऊन जात व भारताबद्दल गप्पा मारत असत. ते पंतप्रधान कार्यालयामध्ये डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांना आर्थिक विषयांवर मदतीसाठी गेले.
त्यानंतर काहीच काळाने मला पंतप्रधान कार्यालयातून संधी देऊ करणारा फोन आला. ही आॅफर मी नाकारू शकत नव्हतोच. मी साऊथ ब्लॉकमध्ये काम सुरू केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे राणा आणि पंतप्रधानांच्या सामाजिक विषयांच्या सचिव उषा भगत यांच्या जवळ राहून काम करता आलं. न्यायाधीशांच्या नेमणुकांबाबत फाइल्सकडे लक्ष देणे व पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय भाषणांचे लेखन हे माझे काम होते. गरज पडल्यावर वायूसेनेच्या पंतप्रधानांसाठी असणाºया विमानातून प्रवासही करावा लागे. पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठका असल्या की त्याचे टिपण काढणे व नोंद ठेवणे हेही काम असे. सनदी नोकरशाहीचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि थेट विद्यापीठातून आल्यामुळे यातील बहुतांश गोष्टी मलाच शिकाव्या लागल्या होत्या. मात्र त्या शिकण्याची व इंदिराजींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.
(शब्दांकन - ओंकार करंबेळकर)