माझी बायको परत मिळवून द्या; संसारात सासरच्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळलेल्या पतीची कोर्टाकडे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 09:13 AM2017-09-01T09:13:20+5:302017-09-01T10:49:35+5:30
बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे
नवी दिल्ली, दि. 1- पती-पत्नीमधील काही कारणावरून झालेली किरकोळ भांडण लगेच मिटतात. पण अनेकदा मोठ्या कारणांवरून झालेली भांडण कोर्टापर्यंत पोहचतात. ही भांडणं घटस्फोटापर्यंत जातात आणि एकमेकांपासून वेगळं होण्याचं पती-पत्नी ठरवतात. एका व्यक्तीने कोर्टाकडे त्याची बायको परत मिळविण्यासाठी अपील केलं आहे. बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे. न्यायाधीश संजय गर्ग यांनी अर्जावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार पत्नीला नोटीस पाठवत 23 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
रोबॉटिक इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या माहेरच्या लोकांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आणि वारंवार आमच्या वैवाहिक आयुष्यात दखल देण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. वकिल पियुष जैन यांनी हिंदू विवाह कायद्याचा 1995 मधील कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करताना पत्नीला पुन्हा सासरी परतण्याचे आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे.
याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी ही एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. वर्षाला 5 लाख इतकं तिचं उत्पन्न आहे. ती 3 मेपासून तिच्या माहेरी राहते. कुठलंही कारण नसताना पत्नी माहेरी निघून गेली, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या दोघांचं 25 जानेवारी 2016 रोजी दिल्लीमध्ये लग्न झालंय लग्नानंतर ते दोघे कडकडडूमा कोर्टाच्या जवळील एजीसीआर एन्क्लेवमध्ये राहत होते. त्याच्या पत्नीचं माहेर गाजियाबादच्या स्वर्णजयंती पुरममध्ये आहे. लग्नानंतर ते दोघं सव्वा वर्ष एकत्र राहिले होते. त्या दरम्यान त्याची पत्नी गरोदर होती. पण पत्नीच्या माहेरकडच्या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तीन महिन्याच्या आत काही कारणाने गर्भपात झाला, असा आरोप त्या याचिकाकर्त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या घरचे काहीना काही कारण देऊन तिला माहेरी घेऊन जात असायचे आणि लवकर घरी पाठवत नसायचे. माहेरी जायला नकार दिल्यावर ती भांडणं करायची. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून ती घरी निघून जायची, असा आरोप त्या व्यक्तीने केला आहे.
या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित व्यक्तीने अखेरीस कोर्टात धाव घेतली आहे.