कर्नाटकातील मठांमधून मिळणार सत्तेचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:56 AM2019-04-08T06:56:18+5:302019-04-08T06:56:28+5:30

सर्वपक्षीय नेते होत आहेत चरणी लीन : अध्यात्माला चढला आहे राजकीय रंग

to get power from monasteries in Karnataka | कर्नाटकातील मठांमधून मिळणार सत्तेचा कौल

कर्नाटकातील मठांमधून मिळणार सत्तेचा कौल

Next

- पोपट पवार 


बंगळुरु : अध्यात्माची शिकवण देत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या कर्नाटकातील मठांमधूनच आता राजकीय वारे वाहू लागल्याने यंदाच्या लोकसभेचा कौल या मठांच्या राजकीय भूमिकेवरच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, अध्यात्माच्या या केंद्रांमधून राजकीय दिशा ठरू लागल्याने सर्वच पक्षांचे नेते मठाधिपतींच्या चरणी लीन होत असल्याचे चित्र आहे.


तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक छोटे-मोठे मठ असलेल्या कर्नाटकातील राजकारणात मठांची भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जाते. कर्नाटकातील काही मठ याआधी राजकीय आखाड्यापासून दूर राहणे पसंत करीत होते. मात्र, जातीय समीकरणे आणि अनुयायांच्या दबावामुळे अनेक मठांनी अध्यात्माला राजकीय जोड देण्याचा प्रयत्न सुरू केल्याने हे मठ राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कर्नाटकात लिंगायत आणि वक्कलिंग समाजाची मोठी लोकसंख्या आहे. हे दोन्ही समाज पूर्वापार अध्यात्माशी जोडले गेले असल्याने कर्नाटकातील प्रत्येक खेड्यात या समाजाशी निगडित मठ विखुरले आहेत. राज्यात १९ टक्के लिंगायत समाज असून, या समाजाचे सर्वाधिक मठ आहेत. त्यामुळे हा समाज सत्तेच्या सारीपाठात नेहमीच निर्णायक राहिला आहे.

सिद्धगंगा मठ हे या समाजाचे सर्वाेच्च स्थान. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या मठाची पायधूळ झाडत लिंगायत समाजाच्या पाठिंब्यासाठी साकडे घातले होते. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तत्कालीन मठाधिपतींची भेट घेत पाठिंबा मागितला होता. या लोकसभा निवडणुकीतही तुमकूरमधील या मठाचा निर्णय काँग्रस-जेडीएस आणि भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थात, नेहमी भाजपच्या पाठीमागे राहणारा हा मठ यंदा कोणत्या पक्षाची सोबत करणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे चित्रदुर्ग जिल्ह्यातील श्रीगेरी आणि मुरुगा मठांच्या कौलामुळे जिल्ह्याची राजकीय दिशा बदलत असल्याने येथेही या मठांचा ‘प्रसाद’ मिळविण्यासाठी नेत्यांनी धडपड सुरू केली आहे.

लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला या मठाने पाठिंबा दिल्याने या मठाचे अनुयायी काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दलित समाजातील मडिगांचे श्रद्धेय स्थान असलेला मदारा गुरू पीठ हा मठही याच जिल्ह्यात असून, दलित मतांच्या बेगमीसाठी सर्वच पक्षांच्या नजरा या मठावर खिळल्या आहेत. तर मंड्या जिल्ह्यातील आदिचुंचनगिरी मठाचा वक्कलिंग समाज सर्वांत मोठा अनुयायी आहे. १३-१४ टक्के लोकसंख्या असलेला हा समाज कर्नाटकच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे. या समाजाशी निगडित असणाऱ्या मठ आणि मठाधिपतींची भूमिका निर्णायक असते. इतिहासाला उजाळा दिल्यास या मठाने आतापर्यंत जेडीएस आणि काँग्रेसच्या पारड्यात आपले माप टाकले आहे.

मोठ्या मठांचा राज्यभर प्रभाव...
राज्यात लिंगायत समाजाचे जवळपास ४००हून अधिक मठ आहेत. तुमकुरचा सिध्दगंगा मठ, चिकमंगलूरचा श्रृगेंरी मठ आणि हुबळी येथील मठाचे अनुयायी काही लाखांच्या घरात असल्याने या मठातील मठाधिपतींनी घेतलेल्या राजकीय निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडत असतात. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत जवळपास २२१ लिंगायत मठांनी काँग्रेसला उघड उघड पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे भाजपची व्होट बँक असलेला लिंगायत समाज अनेक भागात काँग्रेसकडे वळल्याचे दिसून आले होते.

Web Title: to get power from monasteries in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.