इसिसची दहशत थोपवण्यास सज्ज व्हा
By admin | Published: August 2, 2015 03:58 AM2015-08-02T03:58:57+5:302015-08-02T03:58:57+5:30
अनेक देशांपुढे एक आव्हान म्हणून उभी ठाकलेली इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना आता भारतातही पाय रोवू पाहात असल्याच्या संकेतांची
नवी दिल्ली : अनेक देशांपुढे एक आव्हान म्हणून उभी ठाकलेली इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना आता भारतातही पाय रोवू पाहात असल्याच्या संकेतांची केंद्र सरकारने कमालीची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात केंद्राला मिळालेल्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी शनिवारी येथे काही राज्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. इसिसचा संभाव्य धोका हाताळण्यास सज्ज राहण्यासाठीच्या उपायांची त्यात चर्चा झाली.
तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत तरुणांना इसिससारख्या संघटनांच्या विचारसरणीकडे आकर्षित होण्यापासून कसे रोखता येईल, यावर गांभीर्याने विचारविनिमय झाला. कुठल्याही धर्माच्या कट्टरपंथी तत्त्वांकडे तरुणांनी झुकणे हा देशासाठी चिंतेचा विषय आहे आणि हा प्रश्न हाताळण्यासाठी एक निश्चित रूपरेषा आखण्याची गरज आहे, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
देशभरात २५ युवक प्रभावित
देशभरात इसिसच्या विचारसरणीने प्रभावित सुमारे २५ युवकांची ओळख पटली असून, हे युवक या दहशतवादी गटात सामील होण्यास इच्छुक आहेत.
काही राज्यांमध्ये तरुण कट्टरपंथाच्या मार्गाला लागल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. अशा युवकांना समुपदेशनाच्या माध्यमाने समजूत काढून दहशतवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
अलीकडेच तेलंगणामधील १७ तरुणांना सिरियात जाण्यापासून रोखण्यात आले होते. महाराष्ट्रातही चार तरुण पश्चिम आशियात जाण्याच्या तयारीत होते. त्यांना थांबविण्यात आले. यापैकी कुणालाही अटक करण्यात आली नसली तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणात इसिससंबंधी प्रकरणे हाताळण्याकरिता एक आराखडा तयार करण्यात आला आहे. काही प्रकरणांत अटक झाली असली तरी हा पहिला पर्याय असू नये, असे तपास संस्थांचे मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तरुणांमध्ये जागरूकता वाढवून कुणीही त्यांची दिशाभूल करू शकणार नाही याची काळजी घेणे. यासोबतच विविध समुदायांतील ज्येष्ठ नागरिकांना यासंदर्भात तरुणांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले जाईल.
दहशतवादी संघटनांच्या वेबसाईटवर कडक पाळत ठेवण्याचेही डावपेच बैठकीत तयार करण्यात आले. एखादा तरुण इसिसमध्ये सामील होण्याची योजना आखत असल्यास याबाबत सूचना मिळताच त्वरित सक्रिय होऊन त्याला या चक्रव्यूहात अडकण्यापासून बचावाचे एक प्रभावी तंत्र तयार करण्याची सरकारची इच्छा आहे.
भारताच्या दिशेने आगेकूच करीत असलेल्या या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठीचे डावपेच आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी १२ राज्यांचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी सविस्तर चर्चा केली. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीतील अधिकारी सहभागी झाले होते.