‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:40 AM2024-05-07T07:40:05+5:302024-05-07T07:47:58+5:30
Who is Nidhi and Aditi Akhilesh Yadav : निधी मैनपुरीसह सपाच्या इतरही उमदेवारांसाठी रोड-शो, गृहभेटी व चौकसभा घेत पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अजून एक तरुण चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची मुलगी आदिती यादवच्या निमित्ताने मुलायमसिंह यादव यांची तिसरी पिढी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाली आहे. असे म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये जन्मजात राजकारणाचं बाळकडू मिळत असते, परंतु एका प्रमुख राजकीय घराण्यातच अदिती यांचा जन्म झाल्याने त्यांचे राजकारणातलं हे पाऊल उत्तर प्रदेशच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे मानले जात आहे.
निधी मैनपुरीसह सपाच्या इतरही उमदेवारांसाठी रोड-शो, गृहभेटी व चौकसभा घेत पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अजून एक तरुण चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. निधी यादव असे या तरुणीचे नाव आहे. दाेघीही समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.
अदिती यादव यांना प्रत्येक पायरीवर निधी यादव यांची सोबत मिळत आहे. प्रत्येक सभेला हजेरी लावणं असो की, प्रचाराची रणनीती ठरवणे असो, अदिती व निधी या दोहोंनी प्रचाराचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतलेला दिसतोय. अदिती यांच्यासोबत सावलीसारख्या असलेल्या निधी यादेखील चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. अदिती यांनी प्रचार दौऱ्यात कोणत्या मतदारांशी संवाद साधावा, कोणाच्या घरी चहापान घ्यावा, प्रचारात कोणते स्थानिक मुद्दे मांडावे या सर्वांचं मायक्रो प्लॅनिंग निधी यांच्याकडून केले जातेय.
कोण आहेत निधी यादव?
सपाचे माजी आमदार वासुदेव यादव यांची निधी यादव ही मुलगी आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत निधीला सपाने हडिया विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निधी यांना निवडणुकीचे बारकावे शिकण्यासाठी तीन महिने अमेरिकेतदेखील पाठवले होते. यावरून त्या यादव परिवाराच्या किती जवळ आहेत, याचा अंदाज येऊ शकतो.
महिला आघाडीची जबाबदारी
निधी यादव यांना अखिलेश यादव यांनी सपाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुण व आक्रमक चेहरा असलेल्या निधी यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या महिला आघाडीची चांगली फळी बांधली आहे. निधी यांनी ग्रामीण महिलांशी संपर्क वाढवत त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम केले आहे.
निधी या प्रयागराजमध्ये स्वत: पदवी महाविद्यालय चालवत असून, या व्यतिरिक्त त्यांनी या परिसरात गोशाळांचीही जबाबदारी घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या अदिती यांना राजकारणाचे बारकावे समजून सांगताना दिसत आहेत.