बाबो! रस्त्यावर वाहू लागली तुपाची नदी; हंडा-कळशी, भांडी घेऊन लोकांची जमा करण्यासाठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 08:59 AM2022-07-10T08:59:43+5:302022-07-10T09:01:00+5:30
ग्रामस्थांना मोफत तूप मिळालं. हे तूप गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. गावातील सर्व लोक हंडा, कळशी, बादली, भांडी जी मिळेल ती वस्तू घेऊन तूप गोळा करायला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.
नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. याच दरम्यान तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत जमिनीवर तूप वाहताना दिसल्यास कोण सोडेल? राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात अशीच एक अजब घटना घटली आहे. एका दुर्घटनेमुळे ग्रामस्थांना मोफत तूप मिळालं. हे तूप गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. गावातील सर्व लोक हंडा, कळशी, बादली, भांडी जी मिळेल ती वस्तू घेऊन तूप गोळा करायला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.
रस्त्यावर अक्षरश: तुपाची नदी वाहू लागली, गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तूप जमा करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरुपगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अजब प्रकार घडला. या ठिकाणी शनिवारी एक टँकर उलटला. गांधीधामहून रुद्रपूरला जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकरने दुभाजकाला धडक दिली. अपघातानंतर टँकर उलटला.
अपघातानंतर टँकरचं इंजिन आणि केबिनवाला भाग वेगळा झाला. तो रस्त्यापासून दूर 200 मीटर अंतरावर जाऊन पडला. टँकर शेतात पडल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं तूप वाहून जाऊ लागलं. याची माहिती जवळच्या लोकांनी मिळाली. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली.
हातात बादली, बाटली, कॅन घेऊन अनेकांनी अपघातस्थळ गाठलं. विशेष म्हणजे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही ग्रामस्थ तूप गोळा करत होते. थोड्यावेळाने पोलिसांनी ग्रामस्थांना तिथून बाजुला केलं, अपघातस्थळी क्रेन बोलावण्यात आली आणि टँकर हायवेवरून हटवण्यात आला. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.