गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा
By admin | Published: November 4, 2015 01:59 PM2015-11-04T13:59:38+5:302015-11-04T14:11:38+5:30
ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणावरून सतत विरोध सहन करावा लागणारे ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ' भारतातील राजकीय पक्षांनी त्यांच्या फायद्यासाठी माझा वापर करून घेतल्याने मी दुखावलो आहे. मी भारतातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून यापुढे भारतात कधीच येणार नाही' असे त्यांनी म्हटले आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत गुलाम अली यांनी दिल्लीतील कार्यक्रम रद्द केला होता, मात्र शिवसेनेच्या विरोधामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते.
गेल्या महिन्यात मुंबई व पुणे येथे गुलाम अली खान यांचा कार्यक्रम होणार होता, मात्र शिवसेनेने त्यांच्य कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवत तो उधळवून लावण्याचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमासाठी संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अली खान यांना दिल्ली कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. गुलाम अली यांनी होकार देताच ८ नोव्हेंबर रोजी त्यांची मैफिल आयोजित करण्याचे निश्चित झाले आणि त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली होती. पण गुलाम अली खान यांनी प्रकृतीचे कारण देत कार्यक्रम करण्यास अचानक नकार दिल्याने हा कार्यक्रम बारगळला.
मात्र आता गुलाम अली यांनी भविष्यात भारतात कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेच्या सततच्या विरोधामुळे आणि देशातील गढूळ वातावरणामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.