८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार गुलाम अलींचा कार्यक्रम
By admin | Published: October 15, 2015 06:56 PM2015-10-15T18:56:07+5:302015-10-15T19:00:53+5:30
प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या तीव्र विरोधानंतरही आता दिल्लीत ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यक्रम होणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला तीव्र विरोध करून शिवसेनेने तो रद्द करण्यास भाग पाडल्यावरून संपूर्ण देशात संतप्त वातावरण असतानाच आता राजधानी दिल्लीत ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मात्र शिवसेनेने हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा दिला आहे.
८ नोव्हेंबर रोजी दिल्ली गुलाम अली साहेब यांचे स्वागत करेल, असे ट्विट करत मिश्रा यांनी ८ तारखेला दिल्लीत त्यांचा कार्यक्रम होईल हे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर तुम नफरत फैलाते रहो, हम भाईचारा बढाते रहेंगे. तुम कांटे बोते रहो, हम फूल उगाते रहेंगे, असे त्यांनी म्हटले आहे.
गुलाम अली खान हे पाकिस्तानी असल्याने शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता, त्यानंतर मुंबई व पुण्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असताना, त्यांच्या गोळ्यांनी आपले जवान शहीद होत असताना आपण त्यांच्या कलाकारांना भारतात का बोलवायचे? असा सवाल विचारत शिवसेनेने कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. जोपर्यंत पाकिस्तान भारतातील हिंसाचार थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे कोणतेही कलाकार, क्रिकेटपटू यांना भारतात येण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका शिवसेनेन मांडली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेनेच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता.
मात्र कला व राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असून त्यांची गल्लत करू नये असे सांगत देशातील अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराजी दर्शवली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित करण्यास स्वारस्य दाखवले होते. त्यानुसार आता दिल्लीत गुलाम अलींचा कार्यक्रम पार पडणार आहे.