गुलाम नबी आझाद तामिळनाडूतून राज्यसभेवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:15 AM2021-08-18T06:15:12+5:302021-08-18T06:15:51+5:30
Ghulam Nabi Azad : अद्रमूकचे ए. मोहम्मदजान यांचे यावर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. एम. के. स्टॅलिन यांची आझाद यांच्याशी जवळीक असून त्यांची सेवा घेण्यास काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध नाही.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : तामिळनाडूतील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना ही जागा मिळेल, अशी अटकळ आहे. कारण द्रमूक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची ही जागा काँग्रेसचे नेते आझाद यांना देण्याची इच्छा आहे. काँग्रेस आणि द्रमूकची युती असली तर द्रमूक स्वबळावर ही जागा जिंकू शकते.
अद्रमूकचे ए. मोहम्मदजान यांचे यावर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. एम. के. स्टॅलिन यांची आझाद यांच्याशी जवळीक असून त्यांची सेवा घेण्यास काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध नाही. आझाद यांनी अलीकडेच राहुल गांधी यांच्यासमवेत जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. आर. वैथिलिंगम आणि के. पी. मुनूसामी (अद्रमूक) या दोघांनी आमदारकीसाठी राज्यसभेचा राजीनामा दिला होता.