लग्नात आई-वडिलांनी मुलीला दिलेली भेट म्हणजे हुंडा नाही, केरळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:40 AM2021-12-15T11:40:53+5:302021-12-15T11:41:26+5:30
court News: केरळ हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाच्या वेळी वधूला तिच्या आई-वडिलांकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू ह्या हुंडाप्रतिबंधक कायदा, १९६१ च्या अंतर्गत हुंडा मानल्या जाऊ शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
कोची - केरळ हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाच्या वेळी वधूला तिच्या आई-वडिलांकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू ह्या हुंडाप्रतिबंधक कायदा, १९६१ च्या अंतर्गत हुंडा मानल्या जाऊ शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायाधीशांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
कोल्लम जिल्हा हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना जारी केलेल्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेविरोधात सुनावणी करताना कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जिल्हा हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी वधूच्या आई वडिलांनी वधूला दिलेल्या भेटवस्तू परत करण्याचे आदेश दिले होते. कायद्यानुसार वधूच्या आईवडिलांनी त्यांच्या इच्छेने भेट म्हणून दिलेले सोन्याचे दागिने हुंड्यांतर्गत येत नाहीत. याचिकाकर्त्यांनी तर्क दिला की, हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा याचिका जारी करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे.
न्यायमूर्ती एमआर अनिता यांनी हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या आदेशाला फेटाळून लावले. सदर वधूला जे दागिने मिळाले, ते हुंडा म्हणून मिळाले होते का हे स्पष्ट होऊ शकले नाही. महिलेने मागणी केली कि तिला मिळालेले सोन्याचे दागिने तिला परत करण्यात यावे. तसेच तिने हेही सांगितले की, हे दागिने सहकारी बँकेमध्ये ठेवलेले होते.
याचिकार्त्यांनी सांगितले की, ते लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि वधूच्या कुटुंबाने तिला लग्नावेळी दिलेला हार परत कले. महिलेने याला सहमती दर्शवल्यावर याचिका निकालात काढण्यात आली.