इव्हांका ट्रम्पला मिळाली भेट म्हणून 40 लाख रुपयांची साडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 05:03 PM2017-11-29T17:03:24+5:302017-11-29T20:12:42+5:30
जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हैदराबादमध्ये आली आहे. इव्हांका ट्रम्पचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास स्वागत केले असून तिला चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली साडी भेट दिली आहे.
हैदराबाद : जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प हैदराबादमध्ये आली आहे. इव्हांका ट्रम्पचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास स्वागत केले असून तिला चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली साडी भेट दिली आहे.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी इव्हांका ट्रम्पला दिलेल्या साडीची किंमत जवळपास 40 लाखांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. ही साडी बनविण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होते. हैदराबादमधील करीमनगर जिल्ह्यातील कारागीरांनी ही साडी बनविली असून त्या साडीवर चांदीच्या दागिन्यांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. विशेष, म्हणजे ही साडी तयार करण्यासाठी जवळपास 120 कुटुंबीयातील कारागीरांनी मेहनत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ही साडी बनविण्यासाठी दोन महिने आधी ऑर्डर देण्यात आली होती. याचबरोबर, इव्हांका ट्रम्प हिला साडीशिवाय अनेक भेटवस्तू राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये 2.5 किलो चांदीचा चारमिनार आणि 1.5 किलो चांदीचा राजहंसांची प्रतिमा भेट करण्यात आली आहे.
दुसरीकडे, इव्हांका ट्रम्पला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी एक सुंदर लाकडी पेटी भेट दिली आहे. ही पेटी सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे. हैदराबाद भेटीची आठवण म्हणून इव्हांका ट्रम्पला ही सुंदर भेटवस्तू देण्यात आली आहे. सॅडली हस्तकला मूळची गुजरातमधल्या सूरत इथली आहे. तिथे सॅडली हस्तकलेपासून वस्तू तयार केल्या जातात. उत्तम कौशल्य असलेले कलाकार सॅडली हस्तकलेच्या वस्तू तयार करतात. सॅडली हे गुजरातच्या हस्तकलेचे उत्तम उदहारण आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अन्य देशातल्या मोठ्या नेत्यांना भेटतात तेव्हा ते आवर्जून भारतीय संस्कृती, परंपरेशी संबंधीत खास वस्तू भेट म्हणून देतात. त्यामुळे इव्हांका ट्रम्प यांना सुद्धा नरेंद्र मोदींनी अशीच लक्षात राहील अशी भेट दिली आहे.
दरम्यान, चांदीच्या पारंपारिक दागिने घडविण्यासाठी तेलंगणा प्रसिद्ध आहे. याठिकाणी 400 वर्षांपूर्वी पासून चांदीचे दागिने घडविण्याची परंपरा आहे. तर, 19 व्या शतकात ब्रिटनमध्ये सॅडली हस्तकला लोकप्रिय होती. त्यावेळी भारतातून सॅडली हस्तकलेच्या वस्तू ब्रिटनमध्ये आयात केल्या जायच्या. मुंबई शहर त्यावेळी सॅडली वस्तूंच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. ब्रिटनमध्ये बॉम्बे बॉक्सेस' म्हणून या वस्तू ओळखल्या जायच्या.