खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याआधीच गिफ्ट, पगारात झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:17 AM2022-03-31T07:17:52+5:302022-03-31T07:18:33+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून तो ३४ टक्के करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने त्यांना पाडव्याआधीच गिफ्ट दिले आहे. यंदाच्या १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणाऱ्या या निर्णयाचा देशभरातील १.१६ कोटी केंद्रीय कर्मचारी व पेन्शनरांना फायदा होणार आहे. राज्य सरकारनेही गोड बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. २८ टक्क्यांवरून तो ३१ टक्के इतका करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात ४७.६८ लाख केंद्रीय कर्मचारी व ६८.७२ लाख पेन्शनर आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. महागाई भत्त्यापोटी केंद्र सरकारचे ९५,४४.५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
n देशात कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. ही साथ रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारला प्रचंड खर्च करावा लागला.
n त्यामुळे तिजोरीवर मोठा ताण पडला. त्याच्या परिणामी महागाई भत्ता देणे स्थगित करण्याचा, तसेच या भत्त्यात १७%वरून २८%पर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
कोरोना साथीमुळे १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२०, १ जानेवारी २०२१ रोजी द्यावयाचे तीन हप्ते केंद्र सरकारने गोठविले होते.
राज्य कर्मचाऱ्यांचा फायदा असा...
सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सात टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. हा दर १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के इतका करण्यात आला आहे. मार्च २०२२ च्या वेतनासोबत ही वाढ रोखीने देण्यात येणार आहे.
n कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविला होता.
n महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०२१पासून थकबाकीसह मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले आहेत.
n त्याशिवाय १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीतील ११ टक्के महागाई भत्त्याच्या वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.