गिलगिट-बाल्टिस्तानवरून भारताने पाकला खडसावले, राज्याचा दर्जा देण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:26 AM2020-11-02T05:26:04+5:302020-11-02T05:26:35+5:30
Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा.
नवी दिल्ली : गिलगिट-बाल्टिस्तानला तथाकथित राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालीबद्दल भारताने पाकला रविवारी पुन्हा एकदा खडसावले आहे. या प्रकाराद्वारे पाकिस्तान पीओकेची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तो भाग बळकाविण्याचा कट रचत आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असेही भारताने बजावले आहे.
भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी गिलगिट-बाल्टिस्तान भागाला आम्ही राज्याचा दर्जा देणार आहोत, असे म्हटले आहे, तसेच या भागात निवडणुका घेण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करीत आहोत. पाकने बेकायदेशीररीत्या आणि बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग बळकावला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रकार होय. या भागातील नागरिकांवर पाकिस्तानने सात दशके अत्याचार केले असून, ते झाकण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे. या भागाला प्रांताचा दर्जा देण्याऐवजी तो भाग भारताला परत केला पाहिजे.
भारताने नोंदविला तीव्र आक्षेप
- या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला २०१८ मधील प्रशासनिक आदेशात दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, या भागात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या या हालचालींबाबत तीव्र आक्षेप नोंदविला होता.