जिओनीच्या अध्यक्षांनी जुगारात गमावले तब्बल 1 खर्व रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:05 PM2018-11-30T17:05:06+5:302018-11-30T17:08:58+5:30
जुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली - जुगारामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता या जुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. कंपनीच्या या परिस्थितीला चेअरमन लिऊ लिरॉन जबाबदार असल्याची माहिती मिळाली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनची वेबसाईटने Jiemian ने लिरॉन याची जुगाराची सवय कंपनीला महागात पडल्याचं म्हटलं आहे. साइपेनमधील एका कॅसिनोमध्ये लिरॉन जुगार खेळायला गेले होते. मात्र तेथे खेळताना ते तब्बल 10 अरब युआन म्हणजेच जवळपास 1 खर्व रुपये हरले आहेत. तर जिओनीचे चेअरमन लिरॉन यांनी आपण जुगारात 1 खर्व रुपये हरल्याचं मान्य केलं असल्याचा दावा अँड्रॉइड अॅथोरिटीच्या अहवालात करण्यात आला आहे.
जिओनीने आपल्या सप्लायर्सची बिले थकवली आहेत. वेबसाइट Jiemianने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सप्लायर्सनी 20 नोव्हेंबर रोजी शेनजेन न्यायालयात कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जिओनीकडून भारतात 6.5 अब्ज रुपये गुंतवणूक होणार असल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. भारतीय बाजारपेठेत पहिल्या पाच मोबाइल विक्रेत्यांमध्ये येण्याचं उद्दिष्ट कंपनीकडून निश्चित करण्यात आलं होतं. जिओनीने 'जिओनी एफ 205' आणि 'जिओनी एस 11' हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते.