ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:46 PM2017-10-24T22:46:54+5:302017-10-24T23:31:54+5:30
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.
कोलकाता - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. आज रात्री कोलकाता येथील बिर्ला रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
गिरिजा देवी यांचा जन्म 8 मे 1929 रोज उत्तर प्रदेशातील बनारस येथे झाला होता. त्या सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनासाठी त्या प्रसिद्ध होत्या. ठुमरी गायकीला प्रसिद्धी मिळवून देण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने 1989 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या गिरिजा देवी यांनी संगीताचे प्राथमिक धडे आपल्या वडिलांकडून घेतले होते. त्यानंतर गायक आणि सारंगी वादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षी ख्याल आणि टप्पा गायनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी चित्रपट याद रहे मध्ये त्यांनी अभिनय केला होता.
गिरिजा देवी यांनी आपल्या गायनाची सुरुवात ऑल इंडिया रेडिओ, अलाहाबाद वरून 1949 साली केली होती. मात्र उच्चकुलीन महिलेने सार्वजनिक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करू नये, असे त्यांची आई आणि सासूचे मत होते. पण तरीही गिरिजा देवी यांनी 1951 साली आपला सार्वजनिक गायनाचा पहिला कार्यक्रम केला होता.
गिरिजा देवी यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार
- पद्मश्री (1972)
- पद्मभूषण (1989)
- पद्मविभूषण (2016)
- संगीत अकादमी पुरस्कार ( 1977)
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप (2010)
- महासंगीत सन्मान पुरस्कार (2012)
-संगीत सन्मान पुरस्कार (डोवर लेन संगीत संमेलन)
- GIMA पुरस्कार (जीवनगौरव)