गिरिजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिव
By admin | Published: December 23, 2016 01:52 AM2016-12-23T01:52:05+5:302016-12-23T01:52:05+5:30
प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन
चेन्नई : प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, राव यांच्या भवितव्यबाबत काहीही कळले नाही.
मुख्य सचिवपदासोबत गिरिजा वैद्यनाथन दक्षता आयुक्त व प्रशासकीय सुधारणा आयुक्तपदाचाही अतिरिक्त पदभार सांभाळतील. गिरिजा वैद्यनाथन या १९८२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे १९९0 ते १९९३ या काळात गव्हर्नर असलेले एस. वेंकटीरमणन यांच्या त्या कन्या आहेत.
प्राप्तिकर विभागाने पी. रामा मोहन राव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील घर आणि कार्यालयावर एकाचवेळी टाकलेल्या धाडीत ३० लाखांची रोकड (नवीन नोटांत) ५ किलो सोने आणि पाच कोटींची बेहिशेबी उत्पन्न आढळले. मात्र राम मोहन राव यांच्यावरील छाप्यांमुळे अण्णा द्रमुक आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने मात्र या निमित्ताने अण्णा द्रमुक आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. (वृत्तसंस्था)
भाजपाचा कट - अण्णा द्रमुक
राव यांच्या घरी आणि कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडींमागे भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप सत्तारूढ अण्णा द्रमुकने केला आहे. केंद्राच्या विविध योजना आणि विधेयकांना पाठिंबा द्यावा, यासाठी अण्णा द्रमुकवर दडपण आणण्याच्या हेतूने या धाडी टाकण्यात आल्या असाव्यात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. एका माजी मंत्र्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर असे सांगितले की, भाजपप्रणीत एनडीए सरकारचा मोठा डाव असावा.