'कुराणवर कुणी काही बोलत नाही, कारण...', रामचरितमानसवरील टीकेवर केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:45 PM2023-01-22T16:45:49+5:302023-01-22T16:45:56+5:30
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांवर जोरदार टीका केली.
Giriraj Singh On Ramcharit Manas Remarks Row: भगवान श्रीराम आमि रामचरितमानसवर बिहारचे मंत्री चंद्रशेखर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रचंड विरोध होत आहे. या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गिरीराज सिंह यांनी रविवारी (22 जानेवारी) पाटणा येथे बोलताना म्हटले की, "जसा भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे कुराण हा मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ आहे. कुराणबद्दल कोणी काहीही बोलत नाही, कारण 'सर तन से जुदा' केले जाते. हिंदूंच्या पवित्र ग्रंथाविरुद्ध बोलण्याची आजच्या काळात फॅशन झाली आहे,'' अशी टीका त्यांनी केली.
बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी अलीकडेच म्हटले होते की, "तुलसीदासांच्या रामचरितमानसने सामाजिक भेदभाव आणि समाजात द्वेष पसरवण्याला प्रोत्साहन दिले. रामचरितमानसला विरोध झाला कारण त्यात, म्हटले होते की समाजातील खालचा वर्ग शिक्षित झाल्यावर विषारी होतो. रामचरितमानस, मनुस्मृती आणि एम.एस. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स सारख्या पुस्तकांनी सामाजिक विभाजन निर्माण केले," असे विधान त्यांनी केल होते.
गुलाम रसूल यांच्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिले
यापूर्वी गिरीराज सिंह यांनी जेडीयू आमदार गुलाम रसूल बलियावी यांच्या वक्तव्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. गुलाम रसूल म्हणाले होते की, ''जर पैगंबर मुहम्मद यांच्याकडे कोणी बोट उचलले तर मुस्लिम प्रत्येक शहरात मोठा विरोध दर्शवतील. मुस्लिम अजिबात संकोच करणार नाहीत, कारण मुस्लिमांचे जीवन आणि श्वास फक्त पैगंबरांसाठी आहे.''
नितीशकुमारांवर निशाणा साधला
गिरीराज सिंह यांनी जेडीयू नेत्यावर अशी विधाने करून देशातील जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "तुकडे तुकडे टोळीचे नेते रामायणाचा अपमान करुन हिंदूंचा अपमान करतात, पण कुराणावर भाष्य करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. नितीशकुमार हे लाचार मुख्यमंत्री आहेत, ते धृतराष्ट्रासारखे फक्त पाहत आहेत," अशी टीका त्यांनी केली.