प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:53 PM2024-10-21T17:53:13+5:302024-10-21T18:02:34+5:30
गिरिशाला सुरुवातीला पत्रकार व्हायचं होतं, पण तिच्या कुटुंबीयांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला नाही.
आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर नेहमीच जिंकता येतं असं म्हणतात. हरियाणाच्या गिरिशा चौधरी हिने हे म्हणणं सिद्ध केलं. एकदा, दोनदा नव्हे तर अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतरही, गिरिशाने शेवटच्या प्रयत्नात यश मिळवलं. २६३ रँकने यूपीएससी उत्तीर्ण केली. गिरिशाचे आई-वडील दोघेही बँकेत कामाला होते.
गिरिशाला सुरुवातीला पत्रकार व्हायचं होतं, पण तिच्या कुटुंबीयांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला नाही. तिचं सुरुवातीचं शिक्षण कर्नाल येथून झालं. यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक डिग्री मिळवली. डिग्री घेतल्यानंतर तिला EY मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र, चांगला पगार आणि जीवनशैली असूनही ती समाधानी नव्हती.
आपल्या कामावर असमाधानी असलेल्या गिरिशाने खूप विचार करून यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. यावेळीही तिच्या निर्णयावर टीका झाली. पण गिरिशाने कोणाचीही पर्वा न करता तयारी सुरू केली. २०१८ मध्ये पहिला प्रयत्न केला. पण यावेळी तिला प्रिलिम्सही पास करता आली नाही. २०१९ मध्येही अपयशी ठरली.
दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर ती खूप घाबरली होती. तिसरा प्रयत्नही फसला. २०२१ मध्ये सर्व काही विसरून तिने पुन्हा यूपीएससी सीएसई परीक्षेची तयारी केली. पण यावेळी प्रिलिम परीक्षेच्या आदल्या रात्री तिला पॅनिक अटॅक आला. त्यामुळे यावेळीही अपयश आले.
२०२२ हे वर्ष गिरिशाचा पाचवा प्रयत्न होता. यावेळी तिने हरियाणा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. यावर्षी तिने यूपीएससी परीक्षेच्या प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांत यश मिळविलं. गिरिशा चौधरीने २०२३ मध्ये २६३ व्या रँकने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.