छेड काढणा-या तरुणाला तिने रस्त्यातच बदडलं, शेवटी म्हणू लागला 'ताई माफ करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 03:42 PM2018-02-27T15:42:06+5:302018-02-27T15:42:06+5:30
छेड काढणा-या तरुणाला तरुणीने रस्त्यातच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. तरुणी छेड काढणा-याला बदडवत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
नवी दिल्ली - छेड काढणा-या तरुणाला तरुणीने रस्त्यातच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. तरुणी छेड काढणा-याला बदडवत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरबाजारात काही तरुण तरुणीची छेड काढत होते. मात्र तरुणीने न घाबरता सर्वांना धडा शिकवला आहे. ही घटना राजधानी दिल्लीमधील आहे. 25 फेब्रुवारीला ही घटना घडल्याचं कळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार. व्हिडीओमध्ये दिसत असलेली तरुणी आपल्या मित्रासोबत करोल बागमधील गफ्फार मार्केटमध्ये फिरत होती. यावेळी 4-5 जणांच्या टोळक्याने तिची छेड काढत घाणेरडे इशारे करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तरुणी मित्रासोबत रिक्षाने पुढे निघून गेली. पण तरीही त्यांनी त्यांचा पाठलाग करत, अश्लील कमेंट्स करण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर तरुणीचा पारा चढला आणि तिने रिक्षातून उतरुन एका तरुणाच्या कानाखाली लावण्यास सुरुवात केली.
Delhi: Woman manhandled a man, who along with a friend allegedly harassed her by passing lewd comments, while she was travelling in a riksha in Gaffar Market area. A case was lodged over the incident & both accused were arrested. (25.02.2018) pic.twitter.com/VGT2dVbPn7
— ANI (@ANI) February 26, 2018
तरुणी एका तरुणावर हात उचलत असल्याचं पाहून गर्दी होण्यास सुरुवात झआली. गर्दी झाल्याचं पाहून छेड काढणारा तरुणही घाबरला आणि माफी मागू लागला. तरुणीचं ते रौद्र रुप पाहून ताई माफ करा अशी विनवणी तो करु लागला.
व्हिडीओमध्ये तरुणी बोलताना दिसत आहे की, 'आता तुझ्या मित्रांसोबत छेड काढत होतास, आणि आता लगेच ताई झाली'. ही घटना घडत असताना तिथे उपस्थित एका व्यक्तीने मोबाइलवर हा सगळा घटनाक्रम शूट करत सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
तरुणीने तरुणाला बदडत कॉलर पकडून पोलीस ठाण्यापर्यंत खेचत नेलं आणि तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मनीष आणि अभिषेक नावाच्या दोन तरुणांना अटक केली आहे.