लखनौ विद्यापीठात IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; रूममध्ये सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 19:34 IST2024-09-01T19:24:46+5:302024-09-01T19:34:59+5:30
रूममध्ये संशयास्पद स्थितीत मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

लखनौ विद्यापीठात IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; रूममध्ये सापडला मृतदेह
लखनौच्या राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनिका रस्तोगी या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. रूममध्ये संशयास्पद स्थितीत मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अनिका ही IPS संतोष रस्तोगी यांची मुलगी होती, जी सध्या दिल्लीतील एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) मध्ये IG म्हणून कार्यरत आहेत. अनिका रात्री तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने दरवाजा उघडला नाही. ती न दिसल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडला असता अनिका बेशुद्ध अवस्थेत आढळली.
मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकाला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्येच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.
या संशयास्पद मृत्यूमुळे विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.
अनिकाच्या मृत्यूचे खरं कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जे काही सत्य समोर येईल त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.