"तू खाली उतर, हे योग्य नाही...", खांबावर चढलेल्या मुलीला PM मोदी आवाहन करतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:04 PM2023-11-11T20:04:16+5:302023-11-11T20:08:58+5:30
तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत घडलेल्या एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हैदराबाद-
तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत घडलेल्या एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करत होते त्यावेळी वीजेच्या एका उंच खांबावर एक मुलगी चढून भाषण पाहात असल्याचं त्यांना दिसलं आणि मोदींनी भाषण थांबवलं. मोदींनी तातडीनं त्या मुलीला खांबावरुन खाली उतरण्याचं आवाहन केलं आणि तिचं म्हणणं ऐकून घेण्याचं आश्वासन दिलं. यानंतर मुलीनं समाधान व्यक्त केलं आणि ती खाली उतरली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सध्या प्रचारात व्यग्र आहेत. पंतप्रधान मोदी देखील तेलंगणात प्रचारासाठी आले होते. सिकंदराबाद येथे आज मोदींची जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन तर केलंच, पण विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. यावेळी एक मुलगी तिच्या काही मागण्यांसाठी विजेच्या खांबावर चढून निषेध नोंदवत असल्याची घटना घडली. यामुळे उपस्थित सुरक्षारक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वजण मुलीला खाली उतरण्याचं आवाहन करत होते. पंतप्रधान मोदींचंही या गोष्टीकडे लक्ष गेलं आणि त्यांनी स्वत: मुलीला खाली उतरण्याचं आवाहन केलं.
#WATCH | Secunderabad, Telangana: During PM Modi's speech at public rally, a woman climbs a light tower to speak to him, and he requests her to come down. pic.twitter.com/IlsTOBvSqA
— ANI (@ANI) November 11, 2023
"तू खाली उतर, हे असं करणं योग्य नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू खाली उतर...तिथं शॉर्ट सर्किट होऊ शकतं. असं करुन कुणाचाच फायदा होणार नाही. मी तुझ्यासाठीच इथं आलो आहे", असं मोदींनी विजेच्या खांबावर चढलेल्या मुलीला आवाहन केलं. मोदींच्या आवाहनानंतर संबंधित मुलगी खाली उतरली. तसंच स्थानिक नेते कृष्णाजी तुझं म्हणणं ऐकून घेतील, असंही मोदी तिला म्हणाले.