"मी पाकिस्तानातून मित्राला भेटायला आलेय"; ट्रेनमध्ये सापडली मुलगी, चौकशीत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:51 PM2023-09-26T12:51:55+5:302023-09-26T12:55:39+5:30
एका तरुणाची ट्रेनमध्ये एक मुलीशी भेट झाली. मुलीने सांगितलं की, ती पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असून तिच्या मित्राला भेटण्यासाठी भारतात आली होती.
उत्तर प्रदेशच्या एका तरुणाची ट्रेनमध्ये एक मुलीशी भेट झाली. मुलीने सांगितलं की, ती पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असून तिच्या मित्राला भेटण्यासाठी भारतात आली होती. मात्र येथे तिची सर्व कागदपत्रं हरवली आहेत. मुलीने तरुणाकडे मदत मागितली, त्यानंतर तो तरुण मुलीला मुरादाबाद जीआरपी पोलीस ठाण्यात घेऊन गेला. येथील चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.
मुरादाबादच्या निखिल शर्माला काठगोदाम एक्स्प्रेसमध्ये एक अल्पवयीन मुलगी सापडली होती. तिचे वय 17 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणीने सांगितले की, ती पाकिस्तानची असून तिच्या भारतातील मित्राला भेटण्यासाठी कराचीहून आली होती. मात्र येथे तिची सर्व कागदपत्रे गहाळ झाली आहेत. तिने निखिलकडे मदत मागितली. त्यावर निखिलने त्याला मुरादाबादला आणून जीआरपीच्या ताब्यात दिले.
पाकिस्तानचे नाव येताच सुरक्षा दल सक्रिय झाले. तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आली. चौकशीची प्रक्रिया सुरू केली असता ती मुलगी पाकिस्तानची नसून मेरठची असल्याचं समोर आलं. तिचे नाव बुशरा असून ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तपासादरम्यान मेरठमध्ये मुलीच्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती.
अखेर मुलीच्या कुटुंबीयांना कळवून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सीओ जीआरपी देवी दयाल म्हणाले- मुलगी मेरठची रहिवासी आहे आणि मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिने तीन दिवसांपूर्वी घर सोडलं होतं. ती बेपत्ता झाल्याची नोंद मेरठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिचा भाऊ आणि वडील आले होते. त्यांना सर्व प्रकार सांगितला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.