पाळलेल्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या बंगळुरूतील मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:16 AM2017-09-01T10:16:50+5:302017-09-01T10:21:26+5:30
कुत्र्याचा मृत्यू दोन मुलींच्या जीवावर बेतला आहे.
बंगळुरू, दि. 1- घरी कुत्रा किंवा मांजर पाळायला अनेकांना आवडत असतं. प्राण्यांसाठीची असलेली आवड जपण्यासाठी काही लोक आवडीने घरी कुत्रा, मांजर आणतात. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीप्रमाणे प्राण्याची काळजी घेतली जाते. पण बंगळुरूमध्ये घरात पाळलेल्या कुत्र्याचा मृत्यू दोन मुलींच्या जीवावर बेतला आहे. पाळलेल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने त्या कुत्र्याच्या मालकीणीने आणि तिच्या खास मैत्रिणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी पश्चिम बंगळुरूमध्ये ही घटना घडली. घरात पाळलेला कुत्रा मेला म्हणून त्याच्या मालकीणीने आत्महत्या केली. ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला सहन न झाल्याने तिनेही आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतं आहे.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सी गॅमिनी या 19 वर्षीय तरूणीकडे पोमेरेनियन जातीचा जिमी नावाचा कुत्रा होता. काही कारणाने त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. कुत्र्याचा मृत्यू सहन न झाल्याने गॅमिनी हिने अश्वथ नगरमधील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. गॅमिनी हिच्या आत्महत्येच्या काही तासांनंतर तिच्या खास मैत्रिणीने बिन्नी मील्सजवळ ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.
आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असणारी गॅमिनी बंगळुरूमधील आरपीए महाविद्यालयात बी.कॉमचं शिक्षण घेत होती. तिची आई विजयालक्ष्मी शिक्षिका असून वडील चिक्कास्वामी ड्रायव्हर आहेत. 'जिमी हा कुत्रा आमच्याकडे चार वर्षापासून राहत होता. आजारपणामुळे जुलै महिन्यात त्याचा मृत्यू झाला. जिमीच्या मृत्यूनंतर गॅमिनीमध्ये खूप बदल झाले होते. तीला खुश करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करून पाहिले. तिच्यासाठी गेल्या आठवड्यात आम्ही नवा कुत्रा आणला होता. त्याचंही नाव जिमी ठेवलं. पण तरीही गॅमिनी डिप्रेशनमधून बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं, असं गॅमिनीची आई विजयालक्ष्मी यांनी पोलिसांना सांगितलं.