मित्राशी व्हॉट्सअॅपवर चॅट करत असताना मुलीनं केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:29 AM2018-08-21T08:29:21+5:302018-08-21T08:31:08+5:30
कंपनी सेक्रेटरी (सीएस)च्या पदवीचा अभ्यास करणा-या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दिल्ली- कंपनी सेक्रेटरी (सीएस)च्या पदवीचा अभ्यास करणा-या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षीय मुलगी मित्राबरोबर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ चॅट करत होती. चॅट करता करता तिने अचानक आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याची माहिती दिली आहे. या प्रकरणात त्या मुलीच्या मित्राविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, न्यू उस्मानपूर भागात शिवानी शर्मा नावाची मुलगी शनिवारी रात्री मित्रसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ चॅट करत होती. त्याच दरम्यान तिचं मित्राशी कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर तिने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात डीसीपी अतुल कुमार ठाकूर म्हणाले, शिवानीनं जेव्हा आत्महत्येचा निर्णय घेतला, त्यावेळी तिच्या मित्रानं वडिलांना फोन करून सांगितलं. वडिलांचं घराच्या खालीच दुकान आहे.
वडिलांनी लागलीच शिवानीच्या खोलीकडे धाव घेतली. परंतु वडील पोहोचण्याच्या आधीच शिवानीनं गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर शिवानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी शिवानीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. तिच्या मित्राविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.