गळ्यात बी अडकली, कोरोनामुळे रुग्णालयाने उपचार करण्यास चालढकल केली, चिमुकली तडफडून मरण पावली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:15 AM2021-06-03T10:15:41+5:302021-06-03T10:19:01+5:30
Hospital News: रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या खांद्यावर तडफड प्राण सोडले.
पाटणा - बिहारमधील मुझफ्परपूर येथे आरोग्य विभागाकडून झालेल्या मोठ्या हलगर्जीचा प्रकार समोर आला आहे. येथील रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या खांद्यावर तडफड प्राण सोडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूरमधील सदर रुग्णालयात १ जून रोजी मुसहरीतील रघुनाथपूर येथील रहिवासी संजय राम त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला उपचारांसाठी खांद्यावर घेऊन आले होते. या मुलीच्या गळ्यामध्ये लिचीची बी अडकली होती. त्यामुळे ते घाईघाईने तिला रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र या रुग्णालयात कोरोना चाचणीच्या सर्टिफिकेटसाठी त्यांना बराच वेळ इकडून तिकडे फिरावे लागले. या धावपळीत चिमुकलीने उपचारांविना प्राण सोडले.
मुलीच्या मृत्यूनंतर संजय राम तिला खांद्यावर घेऊन रडत होते. त्यावेळी कुणीतही व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. याबाबतचे वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. मुलीच्या मृत्यूबाबत संजय झा यांनी सांगितले की, माझी मुलगी लिची खात होती. त्यावेळी लिचीची बी तिच्या गळ्यात अडकली. तिला उपचारांसाठी मी रुग्णालयात घेऊन आलो. मात्र कोरोनाच्या रिपोर्टसाठी आम्हाला अनेक तास फिरवण्यात आले. त्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेबाबत सिव्हिल सर्जन डॉ. एसएन चौधरी यांनी सांगितले की, एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाली मिळाली आहे. आपातकालीन परिस्थितीत रुग्णावर उपचार आधी सुरू केले जातात. नंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. या घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या तपास अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.