अजब ! बॉयफ्रेंडने फोन नाही उचलला म्हणून तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 03:13 PM2017-10-30T15:13:15+5:302017-10-30T15:14:17+5:30
बॉयफ्रेंडने फोनला उत्तर न दिल्याने नाराज झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे
पुणे - बॉयफ्रेंडने फोनला उत्तर न दिल्याने नाराज झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीने तक्रार करताना आपला प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार केली. 24 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे लेखी तक्रार देतानाही हाच आरोप केला. पोलिसांनी तपास केला असता, सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी समज देऊन दोघांना सोडून दिलं आहे.
गर्लफ्रेंडच्या सततच्या मेसेजेसमुळे वैतागला होता तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणारी तरुणी लातूर जिल्ह्याची रहिवासी आहे. पुण्यात राहणारा आपला प्रियकर फोन उचलत नसल्याने ती नाराज होती. बॉयफ्रेंडने सतत फोनकडे दुर्लक्ष करत असल्याचं लक्षात येताच तरुणीने 9 ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात तक्रार केली की, बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तरुणाची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं. चौकशी केली असता, दोघांनीही एकमेकांशी लग्न केलं असल्याची माहिती मिळाली. मात्र तरुणीच्या वारंवार फोन आणि मेसेज करण्याच्या सवयीला तरुण कंटाळला होता. यामुळे त्याने फोन आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.
27 ऑक्टोबरला केलं होतं लग्न
सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कोणताही एफआयआर दाखल न केल्याने वॉर्निंग देत दोघांना सोडून दिलं. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'माणुसकी म्हणून आम्ही कोणतीच कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणीने कायद्याचा चुकीचा वापर केल्याचंही निष्पन्न झालं आहे'. या प्रकरणात सामील जोडप्याने 27 ऑक्टोबरलाच लग्न केलं आहे.