ट्रेनमध्ये सीट मागणाऱ्या तरुणीला 'तो' म्हणाला,'घरी जाऊन एकमेकांच्या मांडीवर बसा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 05:52 PM2018-06-25T17:52:23+5:302018-06-25T17:54:12+5:30
मित्रासोबत ट्रेनमधून प्रवास करताना सहप्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पीडित तरुणीनं पोलिसाकडे केली आहे व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
कोलकाता - ट्रेनमधून प्रवास करताना गटबाजीचा, उर्मट, बेशिस्त प्रवाशांचा सामना प्रत्येकाला करावा लागतोच. चूक नसणाऱ्या व्यक्तीनं कितीही नरमाईनं घेण्याचा प्रयत्न केला तरीही समोरील उर्मट व्यक्तीला खोडी काढल्याशिवाय किंवा 'आम्हीच कसे बरोबर आहोत', हे दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. असाच काहीसा लोकल प्रवासामधील धक्कादायक अनुभव पश्चिम बंगालमधील एका तरुणीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मित्रासोबत ट्रेनमधून प्रवास करताना सहप्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पीडित तरुणीनं पोलिसाकडे केली आहे व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
खासगी कंपनीमध्ये काम करणारा 28 वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसोबत बराकपूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. वर्दळ असलेल्या स्थानकाहून या दोघांनीही कृष्णानगर लोकल पकडली. लोकलमध्ये एकत्र बसायला जागा मिळावं, यासाठी त्यांना एका सहप्रवाशाला थोडेसे आतील बाजूस सरकण्याची विनंती केली. मात्र,यावर मला पंख्याची हवा लागणार नाही, असे म्हणत या उर्मट प्रवाशानं जागा करुन द्यायला नकार दिला. यानंतर आहे त्या जागेमध्ये तरुण-तरुणी बसले.
काही वेळानं लोकलमध्ये गर्दी आणखी वाढल्यानंतर अन्य प्रवाशांनीही गैरवर्तन केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे. या पूर्ण घटनेचे चित्रण तरुणी आपल्या मोबाइलमध्ये करत व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रारदेखील केली.
तरुणीनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नेहमीप्रमाणे मी सियालदाहहून लोकल पकडली. यावेळी बसायला जागा मिळावी, यासाठी आम्ही सहप्रवाशांना जागा करुन देण्याची विनंती केली. मात्र बसण्यासाठी जागा देण्यास त्यांनी नकार दिला. यातील एकानं पंख्याखालील जागा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र काही वेळानंतर मला आणि माझ्या मित्राला बसण्यासाठी जागा मिळाली. यावेळीही काही प्रवाशांनी 'हा महिलांचा डबा नाहीय, महिला डब्यामध्ये जा', असे म्हणत आरडाओरडा करायला सुरुवात केली. प्रवाशांच्या त्रासाला कंटाळून आम्ही तीदेखील जागा सोडली. यानंतर पंखा हवा असणारा व्यक्ती आमच्याशेजारी येऊन बसला.
त्यावेळी तरुणीनं त्यांना विचारलं की, 'काका, आता तुम्ही जागेवरुन का सरकलात? तुम्हाला आता गरम होत नाहीय का?. यावर त्या प्रवाशानं पुन्हा गैरवर्तन करत उद्धट उत्तर दिले की, 'घरी जा आणि एकमेकांच्या मांडीवर बसा!'. एवढंच नाही तर दुसऱ्या प्रवाशानं तरुणीला तिच्या कपड्यांवरही ऐकवलं. लोकल प्रवासादरम्यान असे कपडे घालून येऊ नकोस. दरम्यान, घातलेले कपडे तोकडे नव्हते तर टी-शर्ट आणि जीन्स घातल्याचे या तरुणीनं पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय, वरिष्ठ नागरिकांकडून अशा पद्धतीची वागणूक मिळणं योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत प्रवाशांकडून मिळालेल्या गैरवर्तणुकीबाबत तरुणीनं संताप व्यक्त केला आहे.