बलात्कार करणा-या तांत्रिकाचे मुलीने गुप्तांग कापले
By admin | Published: August 1, 2014 11:55 AM2014-08-01T11:55:40+5:302014-08-01T11:56:03+5:30
बिहारमधील मधेपूरा येथे एका मुलीवर बलात्कार करणा-या तांत्रिकाला पिडीत मुलीने शिक्षा दिली आहे. पिडीत मुलीने त्या तांत्रिकाचे गुप्तांग कापले आहे.
Next
मधेपूरा (बिहार), दि. १ - बिहारमधील मधेपूरा येथे एका मुलीवर बलात्कार करणा-या तांत्रिकाला पिडीत मुलीने शिक्षा दिली आहे. पिडीत मुलीने त्या तांत्रिकाचे गुप्तांग कापले असून तांत्रिकाची पोलखोल करण्यासाठी तिने तांत्रिकाचा फोन कॉलही रेकॉर्ड करुन पोलिसांकडे सोपवला आहे.
मधूपरा येथे राहणारी पिडीत मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या तांत्रिक नातेवाईकाला उपचार करण्यासाठी बोलवून घेतले. मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत तांत्रिक महेंद्र मेहताने तिला एका खोलीत नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता कुठे करु नको असेही धमकावले. मेहता नातेवाईक असल्याने आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या मुलीला वाटत होते. अखेरीस या घटनेचा बदला घेण्याचा तिने निर्णय घेतला.
काही दिवसांनी पिडीत मुलगी घरी एकटी असताना मेहताने तिला स्वतःच्या घरी बोलवून घेतले. पिडीत मुलीने धैर्य दाखवत रात्री मेहताच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिने मेहताचे बोलणे फोनवर रेकॉर्ड करुन घेतले. यानंतर चाकूने मेहताचा गुप्तांग कापून ती घटनास्थळावरुन पसार झाली.
मेहता हा पिडीत मुलीच्या मावशीचा पती असल्याने मुलीच्या कुटुंबाने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही केला. गावातील पंचायतीनेही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र काही स्थानिक राजकीय नेत्यांनी या घटनेचा विरोध दर्शवत पिडीत मुलीला तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली. पिडीत मुलीने पोलिसांकडे मेहताविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पुरावा म्हणून तिने मेहताचे फोनवर रेकॉर्ड केलेले संभाषणही पोलिसांकडे दिले आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मेहता गावातून पसार झाला आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.