आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:57 PM2023-03-22T18:57:08+5:302023-03-22T18:58:21+5:30
Daughter Save Mother Life: आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे
आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. येथील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरमधील कियूर येथे राहणाऱ्या ममता राय यांना कोब्रा या विषारी सापाने दंश केला. त्यानंतर आईला वाचण्यासाठी मुलगी श्रम्या राय हिने स्वत: आईच्या पायाला सर्पदंश झालेल्या ठिकाणाहून विष तोंडाने ओढून बाहेर काढले. श्रम्या ही कॉलेजमधील विद्यार्थिनी आहे. तर तिची आई ग्रामपंचायत सदस्य आहे.
या बहादूर मुलीची गोष्ट केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. ममता राय ह्या त्यांच्या आईसोबत शेतात गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना त्यांना कोब्रा सापाने दंश केला. वाटेत चालताना त्यांचा पाय चुकून सापावर प़डला होता.. सर्पदंश झाल्याचे समजताच ममता यांनी शरीराच्या इतर भागात विष पसरू नये म्हणून त्यावर कोरडं गवत टाकलं.
ममता यांनी घरी परतल्यावर सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची मुलगी श्रम्या हिने त्वरित त्यांच्या पायातून विष ओढून बाहेर काढले. त्यानंतर ममता राय यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, श्रम्या हिने प्रसंगावधान राखत विष बाहेर काढल्याने ममता यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ममता यांच्यावर एक दिवस उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. श्रम्या ही कॉलेजमध्ये गाइड रेंजर आणि स्काऊट आहे. तिने सांगितले की, कुठल्याही व्यक्तीला साप चावल्यास ते विष तोंडाने ओढून बाहेर काढतात, ह्या तंत्राबाबत मी ऐकले होते. तसेच चित्रपटांमध्येही पाहिले होते. दरम्यान, नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनानुसार जागतिक पातलीवर सर्पदंशामुळे होणाऱ्या एकूण ७८ हजार ६०० मृत्युंपैकी सुमारे ६४ हजार १०० मृत्यू एकट्या भारतात होतात.