होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:24 PM2024-11-08T15:24:42+5:302024-11-08T15:43:21+5:30
lucknow girl found dead : एक तरुणी घरातून फोनवर बोलत बाहेर निघाली, ती परत आलीच नाही.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुणी घरातून फोनवर बोलत बाहेर निघाली, ती परत आलीच नाही. त्यानंतर काही तासांनी तिचा मृतदेह जंगलात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती दुपारी घरातून निघाली, तेव्हा तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला होता. त्याच्यासोबत बोलत बोलत ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती लगेच घरी परतली नाही. काही तासांनी तिचा शोध घेतल्यानंतर गावातील लोकांना जंगलात तिचा मृतदेह दिसला. यानंतर या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ही घटना लखनऊच्या आशियाना पोलीस ठाणे परिसरातील आहे. मुळचे हरदोईचे असलेले शमशाद हे बिजनौर येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची २२ वर्षीय मुलगी गुलशन हिचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. तर, चार महिन्यांनी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होते.
शमशाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन नवीन नात्यामुळे खूप खुश होती. ज्याच्यासोबत तिचे लग्न होणार होते, तो ड्रायव्हर आहे. दोघांमध्ये चांगले नातं जमलं होतं. ते दोघे दिवसभर फोनवर बोलत राहायचे. गुरुवारी दुपारीही ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत-बोलत घरातून बाहेर पडली होती. पण, आम्हाला कळालं की, तिने आत्महत्या केली आहे. आम्हाला कोणावरही कुठला संशय नाही. पण, मुलीने इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे सुद्धा समजले नाही.
काय म्हणाले पोलीस?
पोलिसांनी सांगितले की, जंगलात एका तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमची टीम घटनास्थळी पोहोचली, तेव्हा आम्हाला आढळले की, तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेला होता. तिच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पण, तिचा फोन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचीही चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजते. मात्र तरीही या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.