गर्लफ्रेंडने हाताची नस कापून बॉयफ्रेंडला व्हिडीओ पाठवला; ती गंभीर जखमी तर त्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 05:38 PM2024-10-20T17:38:56+5:302024-10-20T17:43:58+5:30
टोकाचे भांडण, प्रेयसीने हाताची नस कापली अन् प्रियकराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
प्रेम आंधळे असते, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेली बरी असे नेहमी बोलले जाते. अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. आता दिल्लीतून अशीच एक घटना समोर आली आहे, इथे तरुणीमुळे तिच्या प्रियकराला जीव गमवावा लागला. माहितीनुसार, किरकोळ भांडणानंतर संबधित तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिने हाताची नस कापून एक व्हिडीओ बनवला आणि तो प्रियकराला पाठवला. मुलीने नस कापल्याचे समजताच तिच्या प्रियकराने घरी धाव घेतली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले.
मुलीला जबर जखम झाल्याने तिच्या प्रियकराने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले. आपल्या प्रेयसीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून प्रियकराला धक्का बसला. मग प्रियकराचा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचवेळी जखमी मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. दिल्लीतील या प्रेमीयुगुलाच्या कहाणीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मित्रांची आणि कुटुंबीयांची चौकशी केली.
माहितीनुसार, २३ वर्षीय अर्जुन चांद याची एक वर्षापूर्वी एका मुलीशी ओळख झाली. दोघे डेटवर जाऊ लागले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, दोघेही काही ना काही कारणावरून सतत भांडत असत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे पण अर्जुन बेरोजगार असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. रात्री ११.३० च्या सुमारास तिने घरी जाऊन हाताची नस कापून व्हिडीओ अर्जुनला व्हॉट्सॲपवर पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्का बसलेल्या अर्जुनने सर्वप्रथम मुलीच्या आईला माहिती दिली. मग तो रुग्णालयात पोहोचला असता त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.