अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:58 PM2024-05-08T13:58:29+5:302024-05-08T14:00:28+5:30
दोन मुली एकत्र राहण्यावर ठाम होत्या. घरच्यांनी वारंवार प्रयत्न करूनही त्या ऐकत नव्हत्या. विरोध वाढल्यावर त्यांनी घरातून पळ काढला आणि कोर्टात धाव घेतली.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये दोन मुली एकत्र राहण्यावर ठाम होत्या. घरच्यांनी वारंवार प्रयत्न करूनही त्या ऐकत नव्हत्या. विरोध वाढल्यावर त्यांनी घरातून पळ काढला आणि कोर्टात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने आता समलैंगिकता कायद्याच्या आधारे दोन्ही मुलींना त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही मुली आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही मुली एकत्र राहण्यासाठी निघून गेल्या. कुटुंबीयांनी त्या दोघींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या मान्य झाल्या नाहीत. दोघीही एकत्र राहण्यावर ठाम राहिल्या. हे संपूर्ण प्रकरण बिजनौरच्या स्योहारा भागातील आहे जिथे दोन मुली ब्युटी पार्लर चालवत होत्या. मात्र 24 एप्रिल रोजी दोघीही कोणतीही माहिती न देता घरातून गायब झाल्या. संशयाच्या आधारे कुटुंबीयांनी एका तरुणावर खोटा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर तपासादरम्यान वेगळीच गोष्ट समोर आली.
तपासादरम्यान पोलिसांना कळलं की ज्या मुलींचा शोध घेतला जात होता, त्यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता दिल्याचे कारण देत त्यांनी एकत्र राहण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी चार मे रोजी दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले, तेथे त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.
सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही मुलींना प्रौढ मानलं आणि त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर दोन्ही मुली आनंदाने कोर्टाच्या आवारातून निघून गेल्या. त्याचवेळी कुटुंबीयांची निराशा झाली. या प्रकरणी सीओ धामपूर सर्वम सिंह यांनी सांगितले की, दोन्ही मुलींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, त्या निवेदनाच्या आधारे न्यायालयाने दोघींना त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहण्याचे स्वातंत्र्य दिले.