आमदाराची मुलगी व तिच्या पतीला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:19 AM2019-07-16T04:19:54+5:302019-07-16T04:20:00+5:30
भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला.
अलाहाबाद : भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी आणि तिचा पती अजितेश कुमार यांच्यावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला. साक्षी हिने अजितेश कुमार याच्याशी आंतरजातीय लग्न केले असून आम्ही आंतरजातीय लग्न केल्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे, असा आरोप केला होता. त्यानुसार या दोघांना संरक्षण दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्यावर हल्ला झाला.
सुनावणीनंतर साक्षी व अजितेश कुमार हे न्याय कक्षातून बाहेर येताच काही वकिलांनी त्यांना धक्काबुक्की केली, असे साक्षीदार म्हणाले.
न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांनी या जोडप्याला संरक्षण मंजूर केले. राजेश मिश्रा हे आमच्या लग्नावरून नाराज असल्यामुळे आमच्या जीविताला त्यांच्याकडून धोका आहे, असे या जोडप्याने म्हटले होते. साक्षी ही ब्राह्मण तर अजितेश कुमार हा दलित आहे. आम्ही प्रौढ असून आम्ही आमच्या इच्छेने लग्न केलेले असल्यामुळे आमच्या शांततामय जगण्यात मिश्रा किंवा पोलिसांनी अडथळा आणायला नको, अशी विनंती साक्षी व अजितेश कुमारने केली होती.