"मुलींचा मेकअप भुताची दोरी; मुस्लीम IAS, IPS महिलांनी बुरखा घालावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:25 AM2024-01-24T11:25:22+5:302024-01-24T11:27:12+5:30
अजमल यांनी म्हटले की, 'आयएएस, आयपीएस आणि डॉक्टर व्यवसायातील मुस्लिम महिलानी हिजाब (बुरखा) परिधान केला पाहिजे.
मुस्लीममहिलांच्या सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावरुन सातत्याने चर्चा होत असते. तर, मुस्लीम विद्यार्थींनींना शाळेत बुरखा बंदी हाही निर्णय वादाचा ठरला होता. आता, आसाममधील राजकीय पक्ष असलेल्या AIUDF चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिम IAS-IPS आणि डॉक्टरमहिलांना हिजाब म्हणजे बुरखा परिधान करण्याचे आवाहन केले आहे. आसामच्या करीमगंज येथील एका सेभेला संबोधित करताना, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख अजमल यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अजमल यांनी म्हटले की, 'आयएएस, आयपीएस आणि डॉक्टर व्यवसायातील मुस्लिम महिलानी हिजाब (बुरखा) परिधान केला पाहिजे. जर महिलांना बुरखा घालायला किंवा स्वत:चे केस झाकायला येत नसतील, तर मुस्लीम म्हणून त्यांची ओळख कशी होणार?, असा सवाल बदरुद्दीन अजमल यांनी उपस्थित केला आहे. मुली जेव्हा शिक्षणासाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर बुरखा परिधान केलेला असतो. त्यांची नजरदेखील खाली असते आणि त्या मान खाली घालूनच पुढे जाताना दिसून येतात, असे चित्र मी बाहेरील अनेक भागात पाहिले आहे. मात्र, आसामधील मुलींचा विचार केल्यास, त्यांनीही बुरख्यात राहायला हवं. डोक्यावरील केस झाकून ठेवणे आणि बुरख्यात असणे हा आपला धर्म आहे, असेही बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.
मुलींचे केस हे भुताची दोरी असते, मुलींचा मेकअप भुताची दोरी असते. म्हणूनच बाजारात जाण्यापूर्वी मुलांचा चेहरा झाकलेला आणि नजर खाली असायला हवी. सायंसचे शिक्षण घ्या, डॉक्टर व्हा किंवा आयएएस, आयपीएस बना. जर तुम्ही या गोष्टींचं अनुकरुन केलं नाही, तर मुस्लीम डॉक्टर, मुस्लीम आयपीएस कोण?, हे कसे समजणार?, तेही लोक आहेत, आपणही आहोत, मग दोघांमधला फरक कसा लक्षात येणार, असेही अजमल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बदरुद्दीन अजमल यापूर्वीही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आम्ही मुस्लीम चोरी, डाका, लूट.. या सर्वच गुन्ह्यांमधअये नंबर १ आहोत, असे विधान त्यांनी केले होते. मात्र, वाद वाढल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना, जगभरातील मुस्लीम समुदायात शिक्षणाचा अभाव आहे, आमची मुले उच्चशिक्षित नाहीत. त्यामुळे, शिक्षणाचे महत्त्व समजावे म्हणून मी हे विधान केले होते, असे अजमल यांनी स्पष्ट केले होते. आता, त्यांच्या या नवीन विवादाने वाद होणार आहेय