विकले जातात मुलींचे मोबाईल नंबर
By admin | Published: February 4, 2017 01:06 AM2017-02-04T01:06:38+5:302017-02-04T01:06:38+5:30
उत्तरप्रदेशात रिचार्ज शॉपमधून मुलींचे मोबाईल नंबर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नंबरवर फोन करुन मुलींना त्रास देण्याचे प्रकारही राज्यात
लखनौ : उत्तरप्रदेशात रिचार्ज शॉपमधून मुलींचे मोबाईल नंबर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नंबरवर फोन करुन मुलींना त्रास देण्याचे प्रकारही राज्यात वाढले आहेत. याची दखल घेऊन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी १०९० ही पोलीस हेल्पलाईन सुरु केली. यावरील सहा लाख तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी महिलांच्या छळाच्या आहेत.
रिचार्ज शॉपवर मुली मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जातात तेंव्हा त्यांचा नंबर दुकानदारांकडे येतो. याच नंबरची दुकानदारांकडून विक्री होत आहे. मुलींच्या या नंबरवर अज्ञात व्यक्तींचे फोन येत आहेत. मी तुझ्याशी मैत्री करु इच्छितो, अशी विचारणा यातून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साधारण मुलींचे मोबाईल नंबर ५० रुपयांना तर सुंदर मुलींचे नंबर ५०० रुपयांपर्यंत किंमतीत विक्री होत आहेत. दरम्यान, शाहजहांपूर येथील मोहम्मद या २४ वर्षीय तरुणाने मुलींना असे फोन केल्याची कबुली वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तो म्हणाला की, माझ्या मित्राचे रिचार्जचे शॉप आहे. आम्ही दोघे दुकानात असताना मुलींना असे फोन केले आहेत. काही वेळा मुलींना मोबाईलवरुन अश्लिल छायाचित्रही पाठविले आहे.
पूजा (नाव बदलले आहे) या महिलेने पोलीस हेल्पलाईनला तक्रार केली की, तिला एका व्यक्तीचे फोन येतात. हा व्यक्ती वेगवेगळ्या नंबरवरुन रात्रीच्या वेळी फोन करतो. यामुळे माझ्या पतीला संशय येऊ शकतो, अशी भीतीही या महिलेने व्यक्त केली. पोलीस महानिरीक्षक नवनीत सिकेरा यांनी सांगितले की, खोट्या कागदपत्रांच्या आधारे सिमची विक्री केली जात आहे. या प्रकरणी आम्ही तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
असे फोन करणाऱ्यांमध्ये किशोरवयीन, तरुण, वयस्क आदी सर्वांचाच समावेश आहे. कधी हे व्यक्ती चुकून फोन लागला आहे असेही सांगतात. एका वकीलाने यावर मत व्यक्त करताना सांगितले की, या प्रकरणात कडक कारवाई व्हायला हवी. हे विश्वासाचे उल्लंंघन आहे.